मुंबई,दि.20: मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर होताच गुणरत्न सदावर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षणाचा प्रस्ताव सभागृहात मंजूर करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने आज विशेष अधिवेशन बोलावलं.
मनोज जरांगे पाटील यांनी विरोध दर्शविलेला असतानाच सर्वोच्च न्यायालयात आधीचे आरक्षण रद्द करायला लावणारे अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा एकदा शड्डू ठोकले आहेत. विरोधकांनी हे आंदोलन टिकणार नसून मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केल्याची टीका केली आहे.
आज विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक कोणतीही चर्चा न करताच मंजूर करण्यात आले. तसेच विरोधी पक्षांनी मागासवर्ग आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अशातच सदावर्ते यांनी याविरोधात आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?
कोणत्या आधारावर आर्थिक मागासलेपणाला सामाजिक मागासलेपणामध्ये रूपांतरित करत आहात. सर्वोच न्यायालयाचे अनेक निवाडे आहेत, ज्यामध्ये अशा प्रकारची कृती म्हणजेच मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन त्या निकालामध्ये जी काही गाईडलाईन तत्त्व सांगितली होती. त्या गाईडलाईन्सचा चकनाचुर या बिलाच्या माध्यमातून केला आहे. मुळातच मराठा समाज सामाजिक मागास आहे हे दाखवण्यासाठी जो संदर्भा दिला गेला तोही चुकीचा आहे. हा चुकीचा संदर्भ अशा एका व्यक्तीच्या हातात देण्यात आला. जे निवृत्त न्यायाधीश शुक्रे आहेत ते मराठा आरक्षणवादी कार्यकर्ते असल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.