नवी दिल्ली,दि.22: अटकेच्या एका दिवसानंतर आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले की, आपले जीवन देशासाठी समर्पित आहे. केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) न्यायालयात नेले. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, तुरुंगात राहूनही देशासाठी काम करत राहणार आहे.
ईडीचे अधिकारी अरविंद केजरीवाल यांना न्यायालयात घेऊन जात असताना पत्रकारांनी त्यांना विचारले, तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे का? यावर केजरीवाल म्हणाले, “माझे जीवन देशासाठी समर्पित आहे, मग आत असो किंवा बाहेर, मी देशासाठी काम करत राहीन…”
अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास केजरीवाल यांना अटक केली. अशा कारवाईला सामोरे जाणारे ते पहिले मुख्यमंत्री आहेत. 2021-22 साठी रद्द केलेल्या दिल्ली दारू धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांची अटक करण्यात आली आहे. त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने मदतीच्या बदल्यात लाच घेतल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे.
केजरीवाल यांच्या अटकेमागे षडयंत्र असल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. त्याविरोधात पक्षाने देशव्यापी आंदोलन केले.