नाशिक,दि.25: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात वाद चिघळल्यानंतर पोलिसांनी कार्यालयाच सील केले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व बाळासाहेबांची शिवसेना असे दोन पक्ष अस्तित्वात आले आहेत. नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेनामध्ये वाद पेटला आहे. कामगार संघटना आणि कार्यालय पळवापळवीवरून दोन्ही गटात ऐन दिवाळीत जोरदार फटाके फुटले. अखेरीस ठाकरे आणि शिंदे गटातील वादा नंतर महापालिकेतील कार्यालय सील करण्यात आले आहे.
नाशिक पालिकेतील कर्मचारी संघटनेच्या कार्यालयाचा दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाने अचानक ताबा घेतला होता. ठाकरे गटाने घेतलेला ताबा बेकायदेशीर असल्याची शिंदे गटाचे शहराध्यक्ष यांनी पोलिसात तक्रार केली होती. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांकडून कार्यालयच सील करण्यात आले आहे.
नाशिक महापालिकेतील शिवसेना प्रणित म्युन्सिपल कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तीदमे शिंदे गटात गेल्यानंतर कामगार सेना नेमकी कुणाची? यावरून वादाला सुरुवात झाली. तिदमे शिंदे गटात गेल्यानंतर ठाकरे गटाने त्यांची हकालपट्टी केली. त्यानंतर ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी कामगार सेनेची बैठक बोलवत स्वतःला कामगार सेनेचे अध्यक्ष म्हणून घोषित केलं.
त्यानंतर 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असतांनाच बडगुजर यांनी महापालिकेतील कामगार सेनेच्या कर्यालयाचा ताबा घेतला. मात्र याला तिदमे यांनी आक्षेप घेत सरकारवाडा पोलीस ठाण्यात सुधाकर बडगुजर यांच्यासह १५० जणांविरोधात परस्पर संगनमताने कार्यालयाचे कुलूप तोडून ते ताब्यात घेणे, महत्वाची कागदपत्रे आणि दस्तऐवज गहाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची फिर्याद दिली होती.
त्यामुळे नाशकात या दोन्ही गटांमधील वाद दिवसागणिक चिघळत असून मनपातील म्युनिसिपल सेनेचे कार्यालय ताब्यात घेण्यावरून शीतयुद्ध सुरू झाले आहे. दोन्ही गटांनी कामगार सेना आणि कामगार सेनेच्या कार्यालयावर आप आपला दावा सांगितला असून आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज पोलिसांनी हे कार्यालय सील केले आहे.