मुंबई,दि.२१: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी टोक गाठले आहे. उद्धवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत गंभीर आणि अघोरी कृत्यांचे आरोप केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अंधारेंचे धक्कादायक दावे:
• अघोरी प्रथांचा वापर: २ सप्टेंबर २०२४ रोजी सोमवती अमावस्येच्या मुहूर्तावर रूपाली चाकणकर यांनी स्वतःच्या हाताचे बोट (अनामिका) कापून तंत्र-मंत्र विधी केल्याचा दावा पीडित महिलांनी केला असल्याचे अंधारे यांनी सांगितले.
• कौटुंबिक संबंधांवर प्रश्नचिन्ह: खरातच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा आणि त्याच्या मुलीचे लग्न जमले असतानाही चाकणकर तिथे उपस्थित होत्या. इतकेच नाही तर खरातची भाची चाकणकर यांच्या घरीच वास्तव्यास असते, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे.
• CDR तपासाची मागणी: अशोक खरात आणि रूपाली चाकणकर यांच्यातील संबंधांची सत्यता पडताळण्यासाठी दोघांचेही कॉल डिटेल्स (CDR) तपासले पाहिजेत, अशी मागणी अंधारे यांनी लावून धरली आहे.
अजित पवारांच्या बंगल्याबाहेरील जादूटोण्याशी कनेक्शन?
याच प्रकरणात राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रवक्ते सुनील माने यांनीही उडी घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील ‘देवगिरी’ आणि बारामतीतील बंगल्याबाहेर जादूटोण्याचे साहित्य सापडले होते. हे कृत्य भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींनीच केले आहे का? याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तपासाचे चक्र वेगात:
दुसरीकडे, एसआयटी (SIT) प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी खरातची दोन तास कसून चौकशी केली. ५०० कोटींची संपत्ती, १०० हून अधिक वादग्रस्त व्हिडीओ आणि बड्या नेत्यांशी असलेले संबंध यामुळे हे प्रकरण आता केवळ लैंगिक शोषणापुरते मर्यादित न राहता मोठ्या ‘राजकीय षडयंत्रा’कडे वळताना दिसत आहे.








