धर्मवीर आनंद दिघेंची इच्छा आज पूर्ण झाली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

ठाणे,दि.19: राज्यभरात दहींहडी उत्सव उत्साहात साजरा केला जातोय. राजधानी मुंबईतही राजकीय नेत्यांनी मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून यामध्ये अनेक गोविंदा पथकांनी भाग घेतला आहे. दहीहंडीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या ठाण्यात यावेळी एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे.

राज्याला एक ठाणेकर मुख्यमंत्री मिळाला म्हणून टेंभी नाक्याची दिवंगत शिवसेनेचे नेते आणि धर्मवीर आनंद दिघेंची मानाची हंडी यावेळी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाक्यावरील दहीहंडीला उपस्थिती लावली. यावेळी उपस्थित गोविंदांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी एक मोठा खुलासा केला. 

“ठाणेकर मुख्यमंत्री व्हावा अशी धर्मवीर आनंद दिघेंची इच्छा होती आणि ती आज पूर्ण झाली. आनंद दिघे यांच्या भगिनी अरुणाताई यांनी माझ्याजवळ आनंद दिघेंची ही इच्छा बोलून दाखवली होती”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. टेंबी नाक्यावरील दहीहंडीला गोविंदा पथकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली आहे. यावेळी बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील उपस्थित होती. 

“राज्यातील सरकार हे जसं शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांचं आहे. तसं ते गोविंदांचंही सरकार आहे. टेंबी नाका म्हणजे गोविंदांची पंढरी. महाराष्ट्राचा हा इतिहास, परंपरा आणि संस्कृती जोपासण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे यांनी केलं. आज प्रत्येक गोविंदा पथक टेंभी नाक्याच्या दहीहंडीला सलामी देऊन दहीहंडीला सुरुवात करतो. आनंद दिघेंनी दहीहंडीचा उत्सव राज्यभर नेला. त्याच गोविंदांसाठी राज्य सरकारनं तीन महत्वाचे निर्णय घेतले. दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी, 10 लाखांचा विमा आणि दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचं काम आम्ही केलं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here