शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांचे नाव छाननीनंतरच्या उमेदवार यादीतून गायब…

0
अमोल शिंदे-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (संग्रहित छायाचित्र)

सोलापूर,दि.२: शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे (Amol Shinde) यांनी प्रभाग क्रमांक ७ ड मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. छाननीनंतरच्या वैध उमेदवार यादीतून शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे गोंधळ उडाला. ३० डिसेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंतच उमेदवारी दाखल करण्याची वेळ असताना भाजपाने ३ नंतर एबी फॉर्म दिल्याचा आरोप करण्यात आला होता. अशातच परत एकदा उमेदवाराचे नाव वैध यादीतून वगळण्यात आल्याने खळबळ उडाली. 

या प्रकारानंतर अमोल शिंदे यांनी तत्काळ निवडणूक अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर निवडणूक अधिकारी विजया पांगरकर यांनी दुसरी यादी दुरुस्त करून प्रसिद्ध केली. भाजपच्या एबी फॉर्मवरून ज्या निवडणूक कार्यालयात गोंधळ झाला त्याच निवडणूक कार्यालयात हा प्रकार घडला. प्रशासनाच्या या गंभीर चुकीमुळे संपूर्ण निवडणूक यंत्रणाच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निवडणूक प्रशासनात अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेपासून ते छाननीपर्यंत दररोज काही ना काही तर चुका घडत असल्याच्या उमेदवार व राजकीय पक्षांच्या तक्रारी आहेत. आता तर चक्क वैध उमेदवारी यादीतून नावच वगळण्यात आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांच्य कार्यपध्दतीविषयी संशयाला वाव मिळाला आहे. 

काय आहे प्रकरण? 

प्रभाग क्रमांक ७-ड (सर्वसाधारण) येथून अमोल शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून छाननी प्रक्रियेत त्यांचा अर्ज वैध ठरला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या सद्यस्थितीतील उमेदवारांच्या यादीत त्यांच्या नावाऐवजी अन्य उमेदवाराचे नाव असल्याचे आढळून आले. त्यामुळे निवडणूक कार्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. 

हा प्रकार लक्षात येताच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलीस बंदोबस्तही तातडीने तैनात करण्यात आला. दरम्यान, अमोल शिंदे यांच्या मदतीला काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार यांच्यासह विरोधी पक्षातील पदाधिकारीही धावून आले.

अमोल शिंदे व त्यांच्या समर्थकांनी निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक दोन विजया पांगारकर यांची भेट घेऊन हा प्रकार निदर्शनास आणून दिला. पाहणीनंतर टायपिंग करताना अनावधानाने चूक झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. यामध्ये तातडीने दुरुस्ती करून अमोल शिंदे यांचे नाव समाविष्ट असलेली नवी यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here