मुंबई,दि.17: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीवर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील मंथन शिबीरात अमोल कोल्हे गैरहजर राहिले. राष्ट्रवादीवर नाराज असणारे अमोल कोल्हे येत्या काळात ते मोठा निर्णय घेऊ शकतात, असंही बोललं जातंय.
विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे नाराज असल्याची बातमी समोर आली होती. या बातमीवर कोल्हेंनीदेखील नाराज नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. पण त्यांच्या नाराजीच्या वृत्ताला खतपाणी घालणारी आणखी एक बातमी समोर आलीय. अमोल कोल्हे यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक यादीतून गायब झालंय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत, पण गुजरात विधानसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारक यादीतून अमोल कोल्हे यांचं नाव वगळण्यात आलं आहे, यानंतर अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चा आणखी वाढल्या आहेत.
मागच्या 3 वर्षात अमोल कोल्हे मतदारसंघात वेळ देत नाहीत, असा आरोप होत आहे, त्यातच मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या सेलिब्रिटी असल्यामुळेही अडचण होत असल्याचं बोललं जातं, त्यामुळे अमोल कोल्हे यांना मतदारसंघात विरोधकांसोबतच पक्षातील नेत्यांकडूनही टीकेला सामोरं जावं लागतं.
अमोल कोल्हे मधल्या काळात भाजपमधील केंद्रीय नेत्यांच्या संपर्कात असल्याने त्यांच्या भाजपसोबतच्या जवळीकीला दुजोरा मिळतोय. काहीच दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप गरुडझेप हा चित्रपट प्रदर्शित झाला, यावेळी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. ही भेट देखील राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेकांना खुपली आहे. भाजप कार्यकर्ते मात्र अमोल कोल्हे यांचं स्वागत करत आहेत.
अमोल कोल्हे देवेंद्र फडणवीस यांची भेट
अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प, चाकण येथे होणारा इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प या संदर्भात चर्चा करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती.