मुंबई,दि.६: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत बैठक झाली. सर्व राजकीय पक्षांनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात भाजपा, शिंदे गट व अजित पवार गटाची युती आहे. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात १९५ उमेदवारांचा समावेश आहे.
अमित शाह यांनी महाराष्ट्रातील जागावाटपाचा मुद्दा निकाली काढण्यासाठी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा केली. टाईम्स नाऊनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, सह्याद्री अतिथीगृहावर शाहांनी काल एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची भेट घेतली. त्यात भाजपनं ३२-१०-६ चा फॉर्म्युला दिला. शिंदेंची शिवसेना २२ आणि अजित पवारांची राष्ट्रवादी १० जागांसाठी आग्रही आहे. पण मित्रपक्षांना इतक्या जागा सोडण्याची भाजपची तयारी नाही.
मागील निवडणुकीत अखंडित शिवसेना आणि भाजप युतीत लढले. भाजपनं २५, तर शिवसेनेनं २३ जागा लढवल्या. भाजपचे २३, तर सेनेचे १८ उमेदवार विजयी झाले. या १८ पैकी ५ खासदार पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंसोबत राहिले. तर १३ खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता भाजप शिंदेंच्या शिवसेनेला १० जागा देऊ करत आहे. हा प्रस्ताव स्वीकारायचा झाल्यास त्यांना ३ विद्यमान खासदारांचं तिकीट कापावं लागलं. त्यामुळे चुकीचा संदेश जाऊ शकतो. शिंदेंना बंडात साथ दिली आणि खासदारकी गेली, असा याचा अर्थ निघेल. याशिवाय शिंदेंनी भाजपसोबत जाऊन काय मिळवलं. त्यांना आपल्या सगळ्या खासदारांना उमेदवारीही मिळवून देता आली नाही, असा प्रचार ठाकरेंकडून केला जाऊ शकतो.
अजित पवारांनी १० जागांची मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनं मागील निवडणुकीत सातारा, बारामती, रायगड, शिरुर अशा ४ जागा जिंकल्या. चार खासदारांपैकी तीन खासदार बंडानंतरही शरद पवारांसोबत राहिले. तर अजित पवारांसोबत केवळ रायगडचे खासदार सुनिल तटकरे आहेत. लोकसभेचा एकच खासदार सोबत असतानाही भाजप अजित पवारांना ६ जागा देण्यास तयार आहे. पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांची ताकद आहे. ती लक्षात घेता भाजपनं त्यांना ६ जागांचा प्रस्ताव दिला आहे.