छत्रपती संभाजीनगर,दि.4: महाराष्ट्रातील अनेक महापालिकेत सत्ताधारी पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यात सध्या बिनविरोध निवडून आणण्याचा प्रकार सुरू आहे. यावर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगानेही बिनविरोध निवडणून आलेल्या उमेदवारांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल लागणार आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संभाजीनगर येथील अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी फोन करून कशाला पालकमंत्र्यांच्या नादी लागतोस उमेदवारी मागे घेऊन टाक असे म्हणत उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी रविवारी सकाळी एक्सवर एक पोस्ट शेअर करत घाटी रुग्णालयाचे डीन डॉ. शिवाजी सुक्रे यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. डॉक्टरांच्या वेशभूषेत राजकीय सौदेबाजी करू पाहणारे, आमच्या उमेदवारास फोना-फानी करणारे अधिकारी म्हणजे घाटी रुग्णालयाचे डीन डॉ. शिवाजी सुक्रे. 22 जून 2024 पर्यंतचेच नियुक्ती आदेश असलेले सुक्रे अजून डीनच्या पदावर कायम आहेत. पदावर कायम राहू दिल्याची परतफेड ते पालकमंत्र्यांची बाजू घेऊन करत आहेत बहुदा. या अधिकाऱ्याची तक्रार मी राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. या अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवावा आणि त्यास निलंबित करण्याची मागणी पत्रद्वारे केल्याची माहिती दानवे यांनी दिली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संभाजीनगर येथील अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी फोन करून कशाला पालकमंत्र्यांच्या नादी लागतोस उमेदवारी मागे घेऊन टाक असे बोलले आहेत. सदर बाब निवडणूक आचार संहितेनुसार गंभीर असून सदर अतिरिक्त अधिष्ठाता यांना खरे तर बेकायदेशीरपणे येथील नियुक्ती दिली गेलेली आहे. त्यासंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्याधिकरण न्याय संस्थेने देखील या येकायदेशीर नियुक्तीची दखल घेतलेली असून डॉ. शिवाजी सुक्रे यांना फक्त 22 जून 2024 पर्यतच नियुक्तीची अंमलबजावणी करण्याचे निर्देशित केले आहे. तरी या संदर्भात निवडणूक आचारसंहितेचे भंग करणारे डॉ. शिवाजी सुझे यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, निवडणूक आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष याविषयी निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा अंबादास दानवे यांनी पत्राद्वारे दिले.








