सोलापूर,दि.१६: आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करून सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबुक या सोशल मीडियावर औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करून सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करून अशांतता आणि अराजकता माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे २२ जणांविरुद्ध अक्कलकोट उत्तर व दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हा दाखल झालेल्या २२ जणांपैकी ११ जण अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विधानसभेत प्रश्न उपस्थित
अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर ठेवून समाजात तेढ निर्माण केली जात असल्याबद्दल विधानसभेत आवाज उठविला होता. या विषयाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आणि पोलिसांनीही कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने हा विषय गांभीयनि घेतला आहे. अक्कलकोट उत्तर व दक्षिण पोलिस ठाण्याअंतर्गत २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात याबाबतीत एक गुन्हा तर अक्कलकोट दक्षिण पोलिसांत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. मैंदर्गी येथील १४ जणांवर तर नाविंदगी येथील एकावर पोलिसांनी कारवाई केली आहे. मैंदर्गी येथील १४ पैकी आठजण अल्पवयीन आहेत तर दुसऱ्या गुन्ह्यात तिघे अल्पवयीन आहेत. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात जाणीवपूर्वक धार्मिक विद्वेष पसरविण्याचे काम करणाऱ्या प्रवृत्तीची दखल घ्यावी, अशी मागणी सत्ताधारी आमदार कल्याणशेट्टी यांनी केल्याने खळबळ माजली होती. धार्मिक द्वेष, तेढ निर्माण करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा जाणीवपूर्वक वापर केला जातोय का, या अनुषंगाने देखील पोलिस तपास करीत आहेत.
कडक कारवाई केली जाईल
व्हाट्सअप आणि फेसबुक या सोशल मीडियावर सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी बारीक नजर ठेवली आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट कोणीही सोशल मीडियावर टाकू नयेत किंवा शेअर करू नयेत. अन्यथा, संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. राजेंद्र टाकने व महेश स्वामी (पोलिस निरीक्षक)
या लोकांवर होऊ शकते कारवाई
सोशल मीडियावरील स्टेट्सला आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ ठेवणे, तो इतर सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यावर पोलिसांत गुन्हा दाखल होतो. त्याचे गांभीर्य पाहून संबंधिताला अटक देखील होऊ शकते. तत्पूर्वी, संबंधितांना पोलिसांकडून समज दिली जाते. असे कृत्य करणाऱ्या अल्पवयीन मुलांना बालन्याय मंडळापुढे हजर करून चुकीच्या वर्तणुकीबद्दल समज दिली जाते. १८ वर्षांवरील व्यक्तींकडून चांगल्या वर्तनाचा बॉण्ड लिहून घेतला जातो. तरीदेखील, त्याने कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाई होऊन अटक देखील होते. वेळप्रसंगी त्याला तडीपार देखील केले जाते, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.