मुंबई,दि.४: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी जोरदार बॅटिंग केली. ज्यांनी ज्यांनी शिवसेना फोडली किंवा शिवसेनेतून बाहेर त्यांना शिवसैनिकांनी निवडणुकीत पाडलं असे अजित पवार म्हणाले. छगन भुजबळ यांच्या बरोबर शिवसेनेतून बाहेर पडणारे आमदार पुन्हा निवडून आले नाहीत. नारायण राणे यांच्या बरोबर जे शिवसेनेचे आमदार बाहेर पडले त्यांचे काय झाले हे सगळ्यांना माहीत असे अजित पवार म्हणाले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आहे. असेही अजित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधत अजित पवारांनी खोचक टोलेबाजी केली. अजित पवार म्हणाले की, आज देवेंद्रजींना भाषण करताना पाहिलं पण उत्साह नव्हता. विधिमंडळात निवडून आलेल्या आमदारांमध्ये सर्वात नशीबवान देवेंद्र फडणवीस. अडीच वर्षात ते मुख्यमंत्रीही झाले, उपमुख्यमंत्रीही झाले आणि विरोधी पक्षनेतेही झाले. एकही महत्वाचं पद त्यांनी सोडलं नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी टोलेबाजी केली.
शिंदे जर सर्वगुणसंपन्न होते तर
अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत हे सतत का सांगावं लागतं, याचं आत्मपरीक्षण व्हायला हवं. सत्ता येते सत्ता जाते, ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलं नाही. फडणवीसजी तुम्ही इतकं शिंदे यांचं कौतुक करत होते मग तुम्ही तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांना रस्ते विकासचं खातं का दिलं, त्यांना महत्वाचं खातं का दिलं नाही. महाराष्ट्रही याबाबत विचार करेल. नेता मोठा असेल तर खाती जास्त असतात. चंद्रकांत पाटील यांना ते माहिती आहे, असं ते म्हणाले.
ठराव इतका घाईत – –
अजित पवार म्हणाले की, काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत त्याआधी तुम्ही बहुमताची चाचणी घेतली. ठराव इतका घाईत आणण्याची गरज नव्हती असं तज्ञ म्हणतात. काही गोष्टी लांबणीवर टाकण्याचं काम राज्यपाल महोदयांनी केलं आहे. आता एकदम तडफेनं काम चाललंय. राज्यपाल महोदय ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांकडे अध्यक्ष निवडीसाठी गेलो मात्र ती झाली नाही. आता चार दिवसात किती वेगानं घटना घडला. महाराष्ट्रातील जनता याचा विचार करत आहे, असं अजित पवारांनी म्हटलं.
महाविकास आघाडी होताना बऱ्याच गोष्टी घडल्या. खरे तर एकनाथ शिंदे यांचेच नाव आघाडीवर होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घ्यावी, असे ठरले आणि महविकास आघाडीचे सरकार आले. मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे, ती म्हणजे १९८० मध्ये भाजपची स्थापना झाल्यापासून त्यांनी शिवसेनेच्या मदतीने आपला पक्ष वाढवला. १९८० मध्ये भाजपचे १४ आमदार निवडून आले होते. यानंतर १६ झाले. १९९५ ला ४२ वरून भाजपच्या आमदारांची संख्या ६५ वर गेली. १९९९ ला ५६ झाले. २००४ ला ५४ झाले. २००९ ला ४६ झाले आणि २०१४ रोजी चार पक्षांनी वेगवेगळ्या निवडणुका लढल्यानंतर १२२ आमदार भाजपचे निवडून आले. त्यानंतर २०१९ ला १०५ आमदार निवडून आले. याचाच अर्थ भाजपने शिवसेनेत राहून स्वतःची चांगली प्रगती केली. प्रत्येक जण आपापली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतच असतो, असे अजित पवार म्हणाले.