बारामती,दि.2: राजकारणामुळे पवार कुटुंबीयांत फूट पडली आहे. शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यातील दुरावा आणखीन वाढला आहे. बारामतीची परंपरा आहे की पवार कुटुंबीय मोठ्या उत्साहात दिवाळी आणि विशेष करून पाडवा साजरा करतात. पहिल्यांदाच बारामतीत आज दोन्ही पवारांचा पाडवा वेगळा होत आहे. पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी राज्यभरातून लोक येत असतात.
अख्खं पवार कुटुंब ‘गोविंदबाग’ या शरद पवारांच्या निवासस्थानी पाडवा साजरा करायचं. पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते यायचे. मात्र आता पहिल्यांदाच पवारांच्या बारामतीत दोन दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. गोविंदबागेत शरद पवारांना तर काटेवाडीत अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.
#Live Now https://t.co/WtNMNO6jgB
— Supriya Sule (@supriya_sule) November 2, 2024
दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काटेवाडीमध्ये समर्थकांशी भेटीगाठी सुरु केल्या असून, त्यांच्यासह पत्नी सुनेत्रा पवार आणि इतर कुटुंबीयांनीसुद्धा व्यासपीठावर उपस्थित राहत समर्थकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. दिवाळी पाडव्याच्या दिवशी सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी काटेवाडीत जमण्यास सुरुवात केली.
असंख्य कार्यकर्ते ‘गोविंदबाग’ या शरद पवारांच्या बारामतीतील निवास्थानी दाखल झालेत. पवारांना भेटण्यासाठी कार्यकऱ्यांनी गर्दी केली आहे. काहीही झालं तरी शरद पवार आमच्यासाठी सर्वकाही आहेत. त्यांना भेटण्यासाठी आम्ही आलो आहोत. वर्षानुवर्षे आम्ही त्यांना भेटायला येतो. गेली 18 वर्षे मी शरद पवारांना भेटण्यासाठी, त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी येत असतो, असं एका कार्यकर्त्याने सांगितलं.
महत्त्वाचं म्हणजे यावर्षी बारामतीत दोन वेगवेगळे कार्यक्रम होत असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटी बरोबरच पवार कुटुंबीयांमधील फूट हे त्यामागचं कारण आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. फक्त काटेवाडीतच नव्हे, तर दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं बारामतीमध्ये पवार समर्थक आणि चाहत्यांचा स्नेहमेळा होत आहे.