मुंबई,दि.१७: अजित पवार गटाचे सर्व आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. आजपासून विधीमंडळाचे अधिवेशन सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे यंदाच्या अधिवेशनात राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी असे चित्र पाहायला मिळत आहे. काल अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नवनियुक्त मंत्र्यांनी वायबी चव्हाण सेंटरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आजही अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शरद पवारांच्या भेटीला वायबी चव्हाण सेंटरवर आले.
अजित पवार यांनी पुन्हा घेतली शरद पवार यांची भेट
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार व अजित पवार असे दोन गट पडले असून त्यानुसार दोन प्रतोद, दोन विधिमंडळ गटनेते आणि इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती दोन्ही गटांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गट व शिंदे गटाप्रमाणेच सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती झाली आहे. त्यामुळे सोमवार अर्थात आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात नेमकं काय चित्र दिसणार? याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. त्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी रविवारी दुपारी वाय. बी. चव्हाण सेंटरवर शरद पवारांची भेट घेतली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या!
काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
कालप्रमाणे आजही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी या भेटीचे कारण सांगितले. पटेल म्हणाले की, “आज अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार शरद पवार साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी चव्हाण सेंटरला आलो होतो. कालही अजित पवारांसह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री आणि आम्ही इतर सर्वांनी पवार साहेबांचा आशीर्वाद घेतला. काल रविवार असल्यामुळे अनेक आमदार आपापल्या मतदारसंघात होते.”
“आज अधिवेशनामुळे सर्व आमदार मुंबईत आले आहेत, त्यामुळे सर्वजण पवार साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलो. “कालप्रमाणे आजही आम्ही सर्वांनी साहेबांना पक्ष एकसंध ठेवण्याची विनंती केली. त्यांनीही कालप्राणे आमचे म्हणणे ऐकून घेतले, पण काही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्या मनात नेमकं काय आहे, ते मी सांगू शकत नाही. आम्ही त्यांना विनंती केली, त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही,” अशी माहिती प्रफुल्ल पटेलांनी दिली.