मुंबई,दि.20: अजय महाराज बारस्कर यांची गाडी पंढरपूरमध्ये ऐन आषाढी एकादशी दिवशी जळाली. त्यांना धमक्या देण्यात येत होत्या. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे अजय महाराज वादात सापडले होते. त्यांची गाडी जळाल्यानंतर जरांगे पाटील यांचे समर्थक व मराठा आंदोलकांकडून गाडी जाळण्यात आल्याचा आरोप बारस्कर यांनी केला होता.
आज अजय बारस्कर हे थेट भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी दाखल झाले. मात्र त्यांना फडणवीस यांची भेट न मिळू शकल्याने बारस्कर यांनी सागर निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडला होता. परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी अखेर पोलिसांनी बारस्कर यांना ताब्यात घेतलं आहे.
आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरला आलेल्या अजय महाराज याना सातत्याने धमक्या मिळत असल्याचा व्हिडीओ बारस्कर यांनी फेसबुक वर करून व्हायरल केला होता. त्यानंतर बारस्कर यांनी पंढरपूरमध्ये पोहोचल्यावर आपली MH 12 BP / 2001 ही टोयाटो कंपनीची कार भाविकांच्या निवासासाठी उभारलेल्या 65 एकरवरील भक्तिसागर पार्कमध्ये पार्क केली होती.
अजय महाराज बारस्कर स्नान आणि प्रदक्षिणेसाठी गेले होते. त्यावेळी, एकादशीच्या पहाटे त्यांची ही कार पेटलेली आढळून आली होती. त्यानंतर, आज अजय महाराज बारस्कर हे थेट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचल्याचं दिसून आलं.
बारस्कर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर ठिय्या मांडून बसले होते. मात्र, त्यांना याठिकाणी आंदोलनाची परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, येथेही त्यांनी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांच्यावर आरोप केले असून आपणही मराठवाड्यातील सर्वच युवकांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आंदोलन करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.