नवी दिल्ली,दि.17: इराणने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला आहे. बलुचिस्तानमधील जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांना इराणने लक्ष्य केले आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तान हादरला आहे. पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्राच्या बेकायदेशीर उल्लंघनाचा निषेध केला आहे आणि इराणला गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. हे पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.
इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ला केला आहे, ज्यामध्ये दोन मुलांना आपला जीव गमवावा लागला असून तीन मुली जखमी झाल्या आहेत. इराणने पाकिस्तानमधील तेहरानविरोधी दहशतवादी गटाच्या मुख्यालयावर हल्ला केला आहे.
इराणची कारवाई अस्वीकारार्ह असून, या हल्ल्यामध्ये निष्पाप लहान मुलांना जीव गमवावा लागल्याचं सांगत पाकनं कटू शब्दांत निषेध नोंदवला. दहशतवाद हा सर्व देशांसाठी एक मोठं आव्हान असून, त्यासाठी एकत्र येऊन कारवाई करण्याची गरज असल्याचीच बाब आम्हीही मांडत असल्याचं डोळे चमकवणारं वक्तव्य पाकनं करत शेजारी राष्ट्रांकडून करण्यात आलेला हा हल्ला म्हणजे द्विपक्षीय विश्वासाला तडा जाणं, अशा शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली.
जैश अल-अदल दहशतवादी संघटना म्हणून घोषित
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार इराणने पाकिस्तानमधील जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेची दोन ‘महत्त्वाची मुख्यालये’ उद्ध्वस्त केली आहेत. अहवालात असे म्हटले आहे की हल्ले पाकिस्तानच्या बलुचिस्तानच्या एका भागात केंद्रित होते, जेथे जैश अल-अदलचे ‘सर्वात मोठे मुख्यालय’ होते. अल अरेबिया न्यूजच्या वृत्तानुसार, 2012मध्ये स्थापन झालेल्या जैश अल-अदलला इराणने ‘दहशतवादी’ संघटना म्हणून घोषित केले आहे.
हा एक सुन्नी दहशतवादी गट आहे जो इराणच्या दक्षिण-पूर्व प्रांत सिस्तान-बलुचिस्तानमध्ये कार्यरत आहे. गेल्या काही वर्षांत जैश अल-अदलने इराणच्या सुरक्षा दलांवर अनेक हल्ले केले आहेत. डिसेंबरमध्ये, जैश अल-अदलने सिस्तान-बलुचेस्तानमधील एका पोलिस स्टेशनवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली, ज्यात किमान 11 पोलिस कर्मचारी ठार झाले, असे अल अरेबिया न्यूजने म्हटले आहे.