AIMIMचे खासदार इम्तियाज जलील घेणार शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

0

मुंबई दि.२०: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाने भाजपाला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीबरोबर एकत्र येण्याची ऑफर दिली आहे. एमआयएमने राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येऊन लढण्याची ऑफर दिली आहे. या ऑफर नंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. शिवसेनेने ही ऑफर धुडकावून लावली आहे. काँग्रेसचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी MIM शी युती करणे शक्य नाही असे वक्तव्य केले आहे. MIM व भाजपात काहीही फरक नाही असेही थोरात म्हणाले होते.

MIM शी आघाडी करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) स्पष्ट शब्दात नकार दिल्यानंतरही औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) मागे हटायला तयार नाहीत. “मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेऊन माझं म्हणणं मी त्यांच्या कानावर टाकणार आहे. फक्त एमआयएम भाजपची बी टीम आहे, हा आरोप कधीपर्यंत करणार. शेवटी तुमचा आणि आमचा शत्रू एकच आहे, तो म्हणजे भाजप… मग शेवटी ध्येय एक असेल तर मग रस्ते वेगळे का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पवारसाहेबांना भेटून यासंदर्भातील चर्चा मी करेन”, असं खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं.

“विरोधकांचा कावा ओळखा. त्यांच्या शिकारीतला सावज आपल्याला व्हायचं नाही. त्यांचे डाव त्यांच्यावरच उलटवू, असं सांगत एमआयएम ही भाजपची बी टीमच आहे, असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. एमआयएमबरोबर आघाडी-युती कदापि शक्य नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. परंतु मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट नकारानंतरही इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी मात्र प्रपोजल काही थांबवलेलं नाहीय. त्यांनी नकार दिलेला असला तरी मी त्यांची भेट घेऊन माझी बाजू त्यांच्यासमोर मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

“राजकीय पक्षाचे मुख्यमंत्री असू शकत नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते माझेही मुख्यमंत्री आहेत. त्यांचा मला आदर आहे. मी खासदार असून मुख्यमंत्र्यांना भेटू शकत नाही, असं मला कुणी सांगू शकत नाही. मी त्यांना भेटणार, भेटून चर्चा करणार, कमीत कमी मला काय म्हणायचं आहे, हे तरी ते ऐकून घेतील.”

“आपण तर चर्चा तर करु ना. तुम्ही कधीपर्यंत फक्त हिंदुत्ववादी-हिंदुत्ववादी म्हणणार आहात. हे कधीपर्यंत चालणार. भाजप सेनेच्या हिंदुत्वाच्या लढाईमुळे आज देश कुठे चाललाय? आपल्याला देशाची, राज्याची चिंता आहे की फक्त हिंदुत्वाचा जप करणार आहात? मग राज्यातल्या दुसऱ्या समाजाचे आपण मुख्यमंत्री नाही आहात का?”, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.

“आम्ही एक मिशन घेऊन बाहेर पडलोय. मुख्यमंत्र्यांच्या एका नकारानंतर आम्ही नाराज झालो किंवा हार मानली, असं नाहीय. एवढ्यात पराभवाची चर्चा करणं योग्य नाही. भावनिक आणि विविध कळीचे मुद्दे घेऊन राजकारण करणं हा राजकीय पक्षांचा धंदा झालेला आहे. यातून आता बाहेर पडणं गरजेचं आहे, हाच विचार घेऊन मी पवारसाहेबांना आणि उद्धव ठाकरेंना भेटणार” असल्याचं जलील म्हणाले.दि.२०:


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here