मनसेच्या इशाऱ्यानंतर राज ठाकरेंना भेटणार स्टार स्पोर्टचे प्रशासकीय अधिकारी

0

सोलापूर,दि.15: मनसेच्या इशाऱ्यानंतर राज ठाकरेंना (Raj Thackeray) स्टार स्पोर्टचे प्रशासकीय अधिकारी भेटणार आहेत. मनसेने (MNS) नेहमीच मराठी भाषेसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे ही भूमिका घेतली. ऑस्ट्रेलियात यंदाच्या वर्षी 2022 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक जारी झालं आहे. सध्या ऑस्ट्रेलियाच (Australia) विद्यमान टी-20 वर्ल्डकप चॅम्पियन आहे. त्यामुळे, यंदा कोण चॅम्पीयन होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. प्रत्येक क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत कोट्यवधी चाहत्यांना प्रतिक्षा असते, ती भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याची. 2022 वर्ल्डकप मध्येही भारत-पाकिस्तान भिडणार आहेत. मात्र, यंदा मराठीजनांसाठी हा वर्ल्डकप अधिक आपलासा असणार आहे. कारण, मराठी भाषेतही या सामन्यांचं समोलोचन होण्याची शक्यता आहे. 

विश्वचषक स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीनंतर टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे फटाके फुटणार आहेत. मात्र, यंदाच्या वर्ल्डकपमधील भारताचे सामने मराठीजनांसाठीही खास असणार आहेत. मराठी भाषेला दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीविरोधात धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेने आंदोलन केले होते. या आंदोलनाची आणि मनसेच्या मराठी भाषेच्या आग्रहाची दखल स्टार स्पोर्ट्सने घेतली आहे. कारण, विश्वचषक प्रसारित करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स कंपनीचे अधिकारी मनसे अध्यक्ष याबाबत राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज शनिवारी दुपारी १२.३० वाजता स्टार स्पोर्ट्सचे अधिकारी भेट घेणार असल्याचे समोर आले आहे. या भेटीनंतर विश्वचषकाचे मराठीत प्रक्षेपण सुरु होईल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे. कारण, यंदा भारतामधील अन्य प्रादेशिक भाषांमध्ये विश्वचषक प्रक्षेपित करण्यात येणार आहे, मग मराठीमध्ये का नाही, असा सवाल मनसेने उपस्थित केला होता. त्यामुळे, स्टार स्पोर्ट्सकडून मराठीचाही मान राखला जाईल, असे दिसून येते. 

मनसेचे टेलिकॉम सेनेचे अध्यक्ष सतिश नारकर यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. दरम्यान, स्टार स्पोर्ट्सला जागं करण्यासाठी आणि मराठी भाषेला दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीविरोधात धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेकडून शुक्रवारी (14ऑक्टोबर) रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, आता हे आंदोलन स्थगित झाले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here