आदित्य ठाकरे यांचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्याबद्दल मोठं विधानं

0

नाशिक,दि.22: राज्याचे माजी पर्यटन मंत्री तथा युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्याबद्दल मोठं विधानं केलं आहे. मुंबईत काढलेल्या निष्ठा यात्रेनंतर आता आदित्य ठाकरे युवासैनिकांशी शिवसंवादच्या माध्यमातून संवाद साधत शक्तिप्रदर्शन करत आहेत. याच दरम्यान आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेनिमित्त नाशिकमध्ये असून थोड्यावेळपूर्वी ते काळाराम मंदिरात दाखल झाले होते.

काळाराम मंदिरात त्यांनी दर्शन घेतले आहे. त्याचबरोबर मंदिर पुजाऱ्यांकडून विधिवत पूजा देखील केली आहे. आता काही वेळानंतर ते मनमाडकडे मार्गस्थ होणार आहेत. मात्र शिंदेसमर्थक आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी आव्हान दिल्यानंतर आदित्य ठाकरे मनमाडकडे जाणार का?, कांदे यांची भेट घेणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे. यावर आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं आहे. “कांदेंसोबतची भेट चालेल ना, निश्चित भेटू त्यांना पण त्यांनी मातोश्रीवर पण यावं, आम्ही कधीच मातोश्रीचे दरवाजे बंद केले नव्हते” असं म्हटलं आहे. 

“देवाकडे वेगळं काही मागितलं नाही, नेहमी दर्शन घ्यायला येतो त्यानुसार आलोय, बाकी काही नाही. जे दिलंय त्याबद्दल मी आभार मानत असतो, वेगळं काही मागत नाही. लोकांच्या समृद्धीची, आरोग्याची प्रार्थना करत असतो त्यामुळे आलोय. देवाच्या दारी राजकारण नको” असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. सुहास कांदे यांचा मतदारसंघ असलेल्या मनमाडला आदित्य ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. यावेळी तब्बल 5 ते 6 हजार कार्यकर्ते घेऊन सुहास कांदे मनमाडला जाणार असून याबाबत अनेक होर्डिंग उभारण्यात आले आहेत. “माझं काय चुकलं” या आशयाखाली मतदार संघातील कामांची यादी आणि हिंदुत्व या विषयावरून शिवसेना कशी दूर गेली याचा पत्रात उल्लेख असणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here