नाशिक,दि.22: आमच्याकडून एक चूक झाली पण ती चूक आम्ही सुधारणार नाही असे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी म्हटले आहे. मनमाडमध्ये आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरू आहे. यावेळी त्यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधला. फोडाफो़डीचं राजकारण आम्हीही करू शकलो असतो. विरोधी पक्षाला नोटीसा पाठवल्या असत्या. त्रास दिला असता. पण आम्ही हे केलं नाही. आम्ही प्रेम दिलं आणि विश्वास ठेवला, हीच चूक झाली. पण ती चूक आम्ही सुधारणार नाही. कारण माणुसकी आमच्यात आहे. बंडखोरांच्यात एवढीच हिंमत होती तर अडीच वर्ष शांत का राहिले. मांडीला मांडी लावून पाठीत खंजीर का खुपसला? असा सवाल आदित्या ठाकरेंनी केला.
चांगला मुख्यमंत्री असतानाही या लोकांनी बंडखोरी केली. गद्दारांनी प्रश्न विचारायचे नसतात. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही. गद्दारी का केली याचं उत्तर त्यांनी आधी द्यावं, असा टोला आदित्य ठाकरे यांनी यावेळी लगावला.
मविआ सरकारनं अडीच वर्ष चांगलं काम केलं. उद्धव ठाकरे यांच्या कामाची देशाने दखल घेतली. या बंडखोरांना शिवसेनेनं ओळख दिली, त्यांच्याच पाठीत यांनी खंजीर खुपसलं. आम्ही राजकारण करू शकलो नाही. आम्ही राजकीय माणसं नाहीत. राजकारण आम्हाला जमलं नाही. आम्ही लोकांवर लक्ष ठेवलं नाही. ही एकच चूक झाली, असं आदित्य ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.
उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नव्हते. आमच्या अडचणी ऐकून घेत नव्हते, असा आरोप बंडखोर आमदारांनी केला होता. यावरही आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे भेटू शकले नाही, कारण त्यांच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.