Aditya Thackeray: आदित्य ठाकरे यांचे मोठं वक्तव्य, शिवसेना फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार

0

मुंबई,दि.५: शिवसेना फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार आहे असे मोठं वक्तव्य आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केले आहे. ‘इंडिया टुडे’च्या कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray India Today interview) यांनी हे वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात सत्तानाट्य घडलं. एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी भाजपाला साथ देत सरकार स्थापन केलं. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. यानंतर शिवसेनेत फूट कोणामुळे पडली, अशा चर्चा रंगू लागल्या. काही जणांनी यासाठी भाजपाला, तर काहींनी राष्ट्रवादीला जबाबदार धरलं. यावर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरेंनी यावर भाष्य केलं आहे.

‘इंडिया टुडे’च्या एका कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरेंनी शिवसेनेतील बंडखोरीवरून गौप्यस्फोट केला आहे. “शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार आहे. उद्धव ठाकरेंनी आमदारांवर आंधळा विश्वास ठेवला. आम्ही त्यांना आमचे समजत होतो. गेल्या ४० ते ५० वर्षात मुख्यमंत्र्यांकडे राहिलेलं नगरविकास खातं, आम्ही त्यांना देऊ केलं होतं,” असे सांगत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्ला केला.

“आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. आम्हाला वाटलं नव्हतं ते पाठीमागून वार करतील. सत्तेत असताना विरोधी पक्षातील नेत्यांना तडीपारीच्या नोटीसा दिल्या नाहीत. अथवा त्यांच्यावर पाळत ठेवली नाही. मात्र, आमच्या आमदारांवर पाळत ठेवली नाही, ही आमची चूक होती. राजकारण ही घाणेरडी जागा नाही,” असेही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते

“भाजपा अडीच आणि शिवसेना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची बोलणी झाली होती. त्याच आधारावर युती करण्यावर सहमती झालेली. मात्र, भाजपाने ते आश्वासन पाळलं नाही. नाहीतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते. पण, आमचा तत्वांवर विश्वास आहे,” असे आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here