सोलापूर,दि.16: ग्रामसेवकाच्या सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पती-पत्नीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ग्रामसेवक अभिमन्यू बाबासाहेब ताड वय 38,राहणार अक्कलकोट यास शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सोमनाथ लिंबा चव्हाण वय 52 व त्यांची पत्नी मंगल सोमनाथ चव्हाण वय 45 दोघे राहणार कोळीबेट ता.अक्कलकोट, जि. सोलापूर यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा न्यायाधीश सलमान आझमी यांच्यासमोर होऊन त्यांनी गुन्हा शाबित न झाल्याने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी की, दि. 20/09/2018 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ग्रामसेवक अभिमन्यू ताड हे त्यांच्या कार्यालयात कामकाज करीत असताना सोमनाथ चव्हाण व त्याची पत्नी मंगल चव्हाण हे तेथे आले व त्यांनी घरकुल फॉर्म भरणे विषयी माहिती विचारली. त्यावर ग्रामसेवक अभिमन्यू ताड यांनी त्यांना संपूर्ण माहिती सांगून कागदावरती लिहून दिली.
त्यानंतर थोड्यावेळाने दोघे पती-पत्नी ग्रामसेवकास परत माहिती विचारण्यास आले त्यावर ग्रामसेवकांनी त्यांना थोडा वेळ थांबा असे म्हणाले असता, त्यांनी त्यास शिवीगाळ करून धमकी दिली व सरकारी कामात अडथळा आणला, अशा आशियाची फिर्याद ग्रामसेवक अभिमन्यू ताड यांनी अक्कलकोट पोलीस स्टेशन येथे दिली होती. त्यावर पोलिसांनी तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोप पत्रक दाखल केले होते.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीची वकील ॲड.मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात, आरोपींनी हेतू परस्पर अपमान अथवा कोणत्या प्रकारची शिवीगाळ केली, याबाबतचा पुरावा सरकारी पक्षाने शाबित केला नसल्याचा युक्तिवाद मांडला, तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. विनोद सूर्यवंशी, ॲड. दत्ता गुंड, ॲड. अमित सावळगी यांनी तर सरकारतर्फे ॲड. दत्तूसिंह पवार यांनी काम पाहिले.