सोलापूर,दि.२७: ॲट्रोसिटी प्रकरणातून न्यायालयाने चौघांची निर्दोष मुक्तता केली आहे. कुर्डू, ता. माढा येथे चोरी करण्यास आलेल्या आहेत या संशयावरून पारधी महासंघाच्या पंढरपूर तालुका अध्यक्ष सुनीता लाला शिंदे, रा. खरसोळी, ता. पंढरपूर यांचेसह तिघांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचे आरोपावरून कुर्डू गावचे माजी सरपंच, पंचायत समिती सदस्य, पैलवान अण्णा ढाणे, राजकुमार ढाणे, रामचंद्र ढाणे, धनाजी ढाणे सर्व रा. कुर्डू, ता. माढा यांचे विरुद्ध दाखल असलेल्या ॲट्रोसिटी खटल्याची सुनावणी बार्शी येथील सत्र न्यायालयात होऊन न्यायधिशानी अण्णा ढाणे यांचेसह सर्वांची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्याची हकीकत अशी की, फिर्यादी सौ. सुनीता लाला शिंदे या पारधी महासंघाच्या पंढरपूर तालुका अध्यक्ष आहेत. घटनेदिवशी दुपारी त्या आणि त्यांची विवाहित मुलगी लक्ष्मी सुधाकर काळे, जयश्री प्रभू शिंदे, काजल प्रभू शिंदे हे कुर्डू गावातील पांडू टेलरच्या घरासमोर बसल्या असताना सर्व आरोपी हे तेथे आले व त्या चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याचे संशयावरून फिर्यादी व त्यांच्या समवेत असलेल्या जयश्री शिंदे, काजल शिंदे यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली असे सरकार पक्षाचे म्हणणे होते.
सदर खटल्याचे सुनावणी वेळी आरोपीचे वकील ॲड. धनंजय माने यांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले की, साक्षीदार जयश्री शिंदे यांनी उलटतपासात कबूल केले आहे की, तिच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला केसेस दाखल आहेत व अण्णा ढाणे हे त्यांच्याविरुद्ध केसेस दाखल करायला लावतात. या संशयावरून अण्णा ढाणे यांच्याविरुद्ध असलेल्या रागामधून सदरची फिर्याद दाखल केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. विसंगती पूर्वक असलेल्या साक्षी आणि विलंबाने दाखल केलेल्या फिर्यादीवर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे.
या खटल्यात आरोपींतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. शरद झालटे, ॲड. विकास मोटे यांनी काम पाहिले.