सोलापूर,दि.२६: महावितरण कर्मचाऱ्यावर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यात आरोपी महांतेश धोंडाप्पा आलुरे रा. घोळसगाव, ता. अक्कलकोट यास महावितरण कर्मचाऱ्यावर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सोलापुर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी निर्दोष मुक्तता केली.
यात हकिकत अशी की, फिर्यादी महावितरण कंपनी येथे विजसेवक म्हणून अक्कलकोट येथील घोळसगाव येथे कामास होते. बोरगाव व घोळसगाव येथे वीज चोरीचे अनुषंगाने दि. १४/०८/२०१३ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे इतर कर्मचारी असे सर्व जण कारवाई करण्यासाठी गेले होते.
दि. १४/०८/२०१३ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बोरगाव येथील काम संपवून फिर्यादी घोळसगाव येथे गेले असता, तेथे चोरीच्या दोन केसेस करून त्यानंतर फिर्यादी हे त्यांच्या इतर कर्मचारी यांच्या सोबत गावठाण डेपो येथे गेले असता पोलवरील लाईनवर सदर शेतकऱ्यांनी आकडा टाकला होता. सदर आकडा टाकलेल्या शेतकऱ्याचे नाव विचारले असता त्याचे नाव महांतेश धोंडाप्पा आलुरे रा. घोळसगाव, ता. अक्कलकोट असे असल्याचे समजले व त्यानंतर ती वायर गोळा करून पंचनामा करण्यास फिर्यादीने सुरुवात केली.
फिर्यादीने पंचनामा करण्यास सुरुवात केल्यानंतर तलावाच्या विरुद्ध दिशेने महांतेश धोंडाप्पा आलुरे याने सदर केबल वायर हिसकावून घेतली व त्यानंतर फिर्यादी व त्यांचे इतर कर्मचारी तलावास वळण घालून महांतेश धोंडाप्पा आलुरे यांच्यापासी गेले असता, मी केबल देणार नाही व कागद पत्रावर सही करणार नाही असे म्हणून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. अशा आशयाची फिर्याद अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती.
सदर खटल्याच्या सुनावणीवेळी सरकार पक्षातर्फे ५ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी महत्वाचे साक्षीदार म्हणजे फिर्यादी, महावितरण चे अधिकारी व तपास अधिकारी हे होते. फिर्यादी यांची आरोपीचे वकिल ॲड. अभिजित इटकर यांनी घेतलेली उलटतपासणी खटल्यास कलाटणी देणारी ठरली. सदर खटल्याच्या सुनावणीवेळी महत्वाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी मध्ये अनेक बाबींचा खुलासा झाला त्यापैकी काही म्हणजे सदर घटनास्थलावरून चोरीची वीज नेमकी कुठे जात होती याचा कुठलाही खुलासा सबंध दोषारोप पत्रात केला नाही. तसेच घटनास्थळ जवळ आरोपीची शेती किवा घर होते याचा कोणताही ठोस पुरावा तपास अधिकारी यांनी दोषारोप पत्रासोबत जोडणे क्रमप्राप्त असताना हि जोडले नाही.
तसेच महावितरणाच्या अधिकारी यांनी सदर आरोपी वरती नेमकी कोणती दंडात्मक कारवाई केली याचा कोणताही कागदोपत्री पुरावा दोषारोप पत्रात जोडलेला नाही. या सदर बाबींचा प्रखरतेने आधार घेत युक्तिवाद करण्यात आला.
सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरुन सोलापुर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आझमी यांनी आरोपी महांतेश धोंडाप्पा आलुरे रा. घोळसगाव, ता. अक्कलकोट याची महावितरण कर्मचाऱ्यावर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे अॅड. अभिजीत इटकर, अॅड. नागेश मेंडगुदले, अॅड. राम शिंदे, अॅड. संतोष आवळे, अॅड. फैयाज शेख, अॅड. सुमित लवटे, अॅड. शिवाजी कांबळे यांनी काम पाहिले.