Abbas Ansari: आमदार मुख्तार अन्सारीपुत्र अब्बास अन्सारीची पोलीस अधिकाऱ्यांना खुलेआम धमकी

0

दि.4: Abbas Ansari: माफिया डॉन आणि आमदार मुख्तार अन्सारी (MLA Mukhtar Ansari) पुत्र अब्बास अन्सारीने (Abbas Ansari) पोलिसांना खुलेआम धमकी दिली आहे. सोशल मीडियावर (Social Media) व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दरम्यानच्या काळात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अनेक प्रकारची वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.

त्यानंतर आता आमदारपुत्र अब्बास अन्सारीने मुक्ताफळं उधळली आहेत. त्यांनी स्टेजवरून खुलेआम धमकी दिली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर संबंधित आमदारपुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुरुंगात बंद असलेले माफिया डॉन आणि आमदार मुख्तार अन्सारी यांचा पुत्र अब्बास अन्सारीवर गुन्हा दाखल झाला आहे. अब्बास अन्सारी सध्या उत्तर प्रदेशातील मऊ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहे. अलीकडेच त्यांनी एका प्रचारसभेत हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे मऊ पोलिसांनी आता अब्बास अन्सारीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अब्बास हे सपा आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

मुख्तार अन्सारी यांचे पूत्र अब्बास अन्सारी एका सभेत म्हणाले की, ‘माझं अखिलेश यादव यांच्याशी बोलणं झालं आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर सध्याच्या सरकारनं नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या 6 महिन्यांपर्यंत बदल्या केल्या जाणार नाहीत. मी सर्वप्रथम त्यांचा राहिलेला हिशोब चुकता करणार आहे. त्यानंतर या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.’ या वक्तव्यामुळे अब्बास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मऊ पोलिसांनी ट्विट करत माहिती दिली की, ‘उमेदवार अब्बास अन्सारी यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओंच्या आधारे मऊ पोलीस ठाण्यात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याबाबतचा अहवाल निवडणूक अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. जवळपास 17 वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर माफिया डॉन आणि माजी आमदार मुख्तार अन्सारी यांना 16 फेब्रुवारी रोजी जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुख्तार अन्सारीला 2005 मध्ये भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येप्रकरणी कथित भूमिकेसाठी अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून ते तुरुंगात होते. मुख्तार अन्सारी हे पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here