Omicron Variant: बेंगळुरुच्या डॉक्टराने सांगितले ओमिक्रॉनवर मात कशी केली

0

Omicron Variant: भारतात आढळलेल्या दोन ओमिक्रॉन रुग्णांपैकी एक बेंगळुरूतील डॉक्टर होते. त्यांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे.

बेंगळुरू,दि.4.: कोविडच्या (Covid – 19) ओमिक्रॉन (Omicron) या नवीन प्रकाराची प्रकरणे भारतात सर्वप्रथम कर्नाटकात समोर आली आहेत. कर्नाटक (Karnataka) राज्यात या प्रकाराचे 2 बाधित आढळले आहेत. यातील एक ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या विळख्यात सापडलेला बेंगळुरू येथील डॉक्टर आता पूर्ण बरा झाला आहे. मात्र, खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसताना या डॉक्टरला ओमिक्रॉनने कसं गाठलं, हा मोठा प्रश्न असून खुद्द त्यांनीच 21 नोव्हेंबरपासूनचे धक्कादायक अनुभव कथन केले आहे. यानिमित्ताने ओमिक्रॉनबाबत अनेक महत्त्वाच्या बाबीही उघड झाल्या आहेत.

भारतात आतापर्यंत ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहेत. दोघांचीही नोंद कर्नाटकात झाली आहे. त्यातील एक रुग्ण दक्षिण आफ्रिकन नागरिक होता. उपचाराने बरा होऊन तो माघारी परतला आहे. दुसरा रुग्ण बेंगळुरूतील स्थानिक असून पेशाने डॉक्टर आहे. त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला गेल्या 12 दिवसांतील घटनाक्रम सांगितला.

नेमकं काय झालं?

‘माझं अंग दुखत होतं. थंडी वाजत होती आणि 21 नोव्हेंबरच्या रात्री ताप आला. ताप जास्त नव्हता. थर्मामीटरवर पारा 100 फॅरनहाइटपर्यंत गेला होता. श्वास घ्यायला त्रास होत नव्हता आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हलही चांगली होती. तरीही मनात शंका होती त्यामुळे मी दुसऱ्याच दिवशी रुग्णालय गाठलं आणि कोविड चाचणीसाठी स्वॅबचे नमुने दिले. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मी घरातच विलगीकरणात राहून उपचार घेत होतो. मात्र, तीन दिवस झाल्यानंतर मला चक्कर येऊ लागली. त्यामुळे घरचे घाबरले. मला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. तेव्हा ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल 95 होती. पण ताप वाढत चालला होता. एचआरसीटी स्कॅन केले असता फुफ्फुसात अधिक काही बदल झाल्याचे आढळून आले नाही’, असे डॉक्टरांनी सांगितले.

ही घेतली ट्रीटमेंट

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 25 नोव्हेंबरलाच मला ‘ मोनोक्लोनल अँटिबॉडिज ‘चा डोस ( याला कॉकटेल ट्रीटमेंटही म्हणतात) देण्यात आला. त्याने खूप फरक जाणवला. अगदी दुसऱ्याच दिवशी मी एकदम नॉर्मल झालो. कोणतीच लक्षणे जाणवत नव्हती. कोविड झालाच नाही असे वाटत होते. त्याचदिवशी पेशाने डॉक्टर असलेल्या माझ्या पत्नीला माझ्याप्रमाणेच त्रास जाणवू लागला. तिची कोविड चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. माझ्या मोठ्या मुलीची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली होती तर नंतर दोन्ही मुलींची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आली.

खरंतर 29 नोव्हेंबर रोजी मला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला गेला होता. मात्र, मला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे जीनोम सीक्वेन्सिंग अहवालात स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा रुग्णालयात दाखल केले गेले आहे. पत्नी आणि मुलंही याच रुग्णालयात आहेत. आमची छोटी मुलगी पाच वर्षांची आहे. तिला तर आम्ही सगळे पिकनिकला चाललोय असे वाटत होते, अशा शब्दांत डॉक्टरांनी अनुभव कथन केले. मला वाटतं ओमिक्रॉनचा फैलाव झाला आहे.

माझ्याबाबतीत चाचणीतून ते स्पष्ट झाले इतकेच. मला गेले 12 दिवस आलेला अनुभव पाहता अधिक चिंता करण्याचे कारण नाही, असे मला वाटते. खबरदारी मात्र घ्यावी लागणार आहे. ओमिक्रॉनची लागण झाल्यास रुग्णालयात दाखल व्हावं लागेल पण ओमिक्रॉन मृत्यूच्या दारात नेईल, याची शक्यता कमी वाटते, असा तर्कही एक डॉक्टर या नात्याने त्यांनी काढला. डॉक्टर दाम्पत्याने कोविडवरील लसचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.

दरम्यान, संबंधित डॉक्टरच्या संपर्कातील एकूण पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्या सर्वांचे जीनोम सीक्वेन्सिंग अहवाल अद्याप यायचे आहेत. डॉक्टरच्या संपर्कातील आणखीही व्यक्तींची चाचणी करण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here