मुंबई,दि.१४ः मराठी अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणं केतकीला महागात पडलं आहे. या प्रकरणी केतकीविरोधात कळव्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष स्वप्नील नेटके यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
केतकी चितळे ही तिच्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यामुळं नेहमी चर्चेत असते. अनेकदा ती राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर सोशल मीडियावरुन तिचं मत मांडत असते. त्यामुळं अनेकदा ती सोशल मीडियावर ट्रोलही होत असते. आता केतकीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत टीका केली आहे. फेसबुकवर एक पोस्ट तिने लिहली आहे.
केतकी चितळेनं केलेल्या या पोस्टवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असून तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष स्वप्नील नेटके यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. केतकी चितळेनं ही पोस्ट केल्यामुळं पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. केतकीनं ही पोस्ट करुन दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना, तेढ निर्माण करण्याचे कृत्य केलं आहे. शरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीनं केली, असं नेटके यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. कळवा पोलीसांनी केतकीविरोधात कलम ५०५(२), ५००,५०१, १५३ ए नुसार कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.