सोलापूर,दि.२ : सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातून जाणारी नियोजित मुंबई-हैदराबाद बुलेट (हायस्पीड) ट्रेन करीता ७८४ एकर जमिनीचे भूसंपादन होणार आहे. ग्रामीणसाठी मूल्यांकनापेक्षा पाच पट जास्त, तर शहरासाठी अडीच पट जास्त मोबदला मिळणार असल्याची माहिती जनसुनावणीदरम्यान देण्यात आली.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई-हैदराबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या अनुषंगाने पर्यावरण आणि सामाजिक दृष्टीने सार्वजनिक सल्लामसलतीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस खा. जयसिद्धेश्वर महास्वामी, आ. सुभाष देशमुख, भूसंपादन अधिकारी अरुणा गायकवाड, प्रांताधिकारी हेमंत निकम, आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून संंबंधित हायस्पीड बुलेट ट्रेनसंदर्भात विस्तृत माहिती देण्यात आली. प्रास्ताविक अपर्णा कांबळे यांनी केले. त्यानंतर पीपीटीद्वारे बुलेट ट्रेनसंदर्भातील सर्व माहिती, जमीन भूसंपादन, कालावधी, आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
नियोजित मुंबई-हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेनच्या ६४० किलोमीटरच्या मार्गावर नवी मुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, विकाराबाद, हैदराबाद हे स्थानके असणार आहेत.