सोलापूर,दि.२६: Solapur Accident: पुणे सोलापूर महामार्गावरून (Pune Solapur Highway) अक्कलकोटला जाण्यासाठी येत असताना मार्केट यार्ड समोरील मालट्रकला मागून दिलेल्या धडकेत कारमधील पाचजण जागीच ठार झाले, तर चार जण जखमी झाले. ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी ३ वाजता घडली.
सचिन शितोळे (३५ रा. धारवाड, कर्नाटक), गौरी दिलीप जाधव (१५), दिलीप जाधव (३०), सोनाबाई जाधव (५५), लाडू जाधव (१ वर्ष, सर्व रा. मिरज, जि. सांगली) असे ठार झालेल्यांची नावे आहेत. वर्षा सचिन शितोळे, रेखा दिलीप जाधव (३०), ईशा जाधव (३ वर्ष, दोघी रा. मिरज, जि. सांगली), विनायक देवकर (१६, रा. लोहियानगर, ता. हुबळी, जि. धारवाड, राज्य कर्नाटक) हे जखमी झाले आहेत. पंढरपूर अक्कलकोट व गाणगापूर देवदर्शन करण्यासाठी सर्वजण पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कारने (क्र. एमएच १२ डीएस ५०६१) मिरजमधून निघाले होते.
सकाळी १० वाजता सर्वजण पंढरपुरात आले. नदीत आंघोळ केली. विठ्ठलाचे दर्शन घेतले वाटेमध्ये जेवण करून सर्वजण अक्कलकोटला जाण्यासाठी सोलापूरच्या दिशेने निघाले. दुपारी ३ वाजता कार सोलापुरात आली. अक्कलकोटला जाण्यासाठी पुणे – सोलापूर मार्गावरून मार्केट यार्डच्या दिशेने जात होती. कार वेगात होती. मार्केट यार्डसमोरील कडेला उभ्या असलेल्या मालट्रकला (क्र. एमएच १२ क्यूडब्लू ९५८७) मागून जोरात धडक दिली. धडक इतकी जोरात बसली की कारचा अर्धा भाग मालट्रकच्या मागील टायरपर्यंत घुसला. अपघाताचा आवाज येताच यार्डजवळ असलेले लोक व वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळी धावत आले. जखमींना तत्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.