सोलापूर पालिकेची सोमवारी नियोजन बैठक
सोलापूर दि.२ : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे धार्मिक स्थळे बंद करण्यात आलेली होती. सोलापूर शहरातील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे ७ आँक्टोंबर रोजी उघडण्यास महापालिका आयुक्तांनी परवानगी दिली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे बंद करण्याचे आदेश शासनाने काढले होते.त्याप्रमाणे गेल्या अनेक दिवसापासून ही धार्मिक स्थळे बंद होती. मंदिरे उघडावीत यासाठी भाजपाने राज्यभर आंदोलने केली होती.
शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे ७ आँक्टोंबरपासुन शहरातील धार्मिक स्थळे उघडण्यास आयुक्तांनी परवानगी दिली आहे. मात्र कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे बंधनही घातले आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी आयुक्तांनी येत्या सोमवारी म्हणजेच ४ आँक्टोंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात नियोजनाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शहरातील धार्मिक स्थळे तसेच प्रार्थना स्थळांचे विश्वस्त किंवा त्यांचा एक प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी केले आहे.
धार्मिक स्थळे तसेच प्रार्थना स्थळे उघडताना विश्वस्त आणि पदाधिकारी यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. एकाच ठिकाणी भाविकांची गर्दी होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. भाविकांना मास्क, सँनिटायझर, सोशल डिस्टन्स या नियमांचे पालन झाले पाहिजे असेही खोराटे यांनी सांगितले.