गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची लाऊड स्पीकरबाबत मोठी घोषणा

0

मुंबई, दि.१८: महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी (Dilip Walse Patil) यांनी लाऊड स्पीकरबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यात सध्या भोंग्यावरून वातावरण तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करायला हवे असे सांगत ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढावेत अशी मागणी केली आहे. भोंग्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच आता राज्य सरकार या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करत असून राज्याचे पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे. त्यानुसार येत्या १-२ दिवसांत भोंग्यांबाबत नियमावली जारी केली जाईल अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केली.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्याचे पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांची बैठक होणार आहे. या बैठकीत भोंग्यांबाबत निर्णय घेतला जाईल. येत्या १-२ दिवसांत भोंग्यांबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली जाईल. त्यानुसार पुढील अंमलबजावणी केली जाईल. राज्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केल्यानंतर ही नियमावली जारी केली जाईल असं त्यांनी सांगितले.

तसेच राज्यात कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस सतर्क आहे. गृह विभाग प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. कुणीही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रात सामाजिक सलोखा राखण्यासाठी सोशल मीडियावर पसरणाऱ्या मेसेजवर लक्ष ठेवले जात आहे. आतापर्यंत धार्मिक भावना दुखावणाऱ्या एकूण ३ हजाराहून अधिक पोस्ट डिलीट केल्या गेल्या आहेत. जर कुठल्याही प्रकारे तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास कारवाई करणार असंही दिलीप वळसे पाटलांनी सांगितले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here