सोलापूर,दि.९: जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहायक पोलीस निरीक्षक दिनेश श्रीकांत कुलकणी हे ५० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपतच्या (ACB) जाळ्यात अडकले आहेत. ही कारवाई मंगळवारी सकाळी जोडभावी पेठ पोलीस चौकीत करण्यात आली. यातील तक्रारदाराच्या मेहुण्याच्याविरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कुलकर्णी हे करीत होते. या गुन्ह्यात तक्रारदार, त्यांची पत्नी, सासू, थोरला मेहुणा, मेहणी आणि तिचा नवरा यांनादेखील आरोपी करणार असल्याचे कुलकर्णी यांनी तक्रारदाराला सांगितले. त्यांना गुन्ह्यात आरोपी करायचे नसेल तर एक लाख रुपये लाचेची मागणी केली.
तडजोड करून ५० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने लाचलचपत विभागाने ३१ जानेवारी १ व २ फेब्रुवारी रोजी पडताळणी केली. त्यामध्ये पैशांची मागणी केल्याची खात्री झाल्याने मंगळवारी त्यांच्याविरुद गुन्हा दाखल करून कुलकर्णी यांना अटक करण्यात आली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, सुहास नाडगौडा, पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस नाईक कोष्टी, पवार, सण्णके, सुरवसे यांनी केली.