मुंबई,दि.१०: Hijab Controversy: हिजाबवरून (Hijab Row) देशातील अनेक राज्यात वातावरण तापले आहे. कर्नाटकातील हिजाबवरून सुरू झालेले वादळ महाराष्ट्रात पोहचले आहे. सोलापूरसह अनेक शहरात यावरून आंदोलन करण्यात आले आहेत. ठाण्यातील मुंब्रा येथे हिंदू मुस्लिम एकता पाहायला मिळाली. अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण हिजाबच्या समर्थनार्थ सरसावले आहेत तर अनेकजण विरोधात आहेत.
कर्नाटकातील हिजाब वादाचे पडसाद राजकारणापासून बॉलिवूडपर्यंत उमटले आहेत. या प्रकरणावरुन विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहीजण हिजाबचे समर्थन करत आहे, तर काहीजण याचाविरोध करत आहेत. यातच आता प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनीही या हिजाब वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
जावेद अख्तर म्हणाले
जावेद अख्तर यांनी मुलींना धमकावणाऱ्या जमावाचा निषेध, तर हिजाबला विरोध केला आहे. जावेद अख्तर यांनी ट्विट केले की- ‘मी कधीच बुरखा आणि हिजाबच्या बाजूने नव्हतो. मी अजूनही माझ्या भूमिकेवर ठाम आहे. पण, मुलींना धमकावणाऱ्या गुंडांचाही मी निषेध करतो. हा पुरुषार्थ आहे का?’ असा प्रश्न जावेद अख्तर यांनी विचारला आहे.
जावेद अख्तरच्या आधी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हिजाब वादाचा निषेध केला आहे. यामध्ये स्वरा भास्कर, रिचा चढ्ढा, कमल हसन, ओनीर यांच्या नावांचा समावेश आहे. स्वरा भास्करने आपल्या ट्विटमध्ये या घटनेला लज्जास्पद म्हटले होते. हिजाब घातलेल्या मुलीला घेरणाऱ्यांना तिने लांडगा म्हटले. तर, रिचा चढ्ढाने आपल्या मुलांना योग्य शिक्षण देण्याचे आवाहन केले.