Home क्राइम घेरडी ॲट्रॉसिटी प्रकरणी नऊ जणांची निर्दोष मुक्तता

घेरडी ॲट्रॉसिटी प्रकरणी नऊ जणांची निर्दोष मुक्तता

0

सोलापूर,दि.१४: सोलापूर जिल्ह्यातील घेरडी येथे शेतजमिनीच्या बांधावरून झालेल्या वादाप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या ॲट्रॉसिटी आणि धमकीच्या खटल्यात विशेष सत्र न्यायालयाने नऊ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. सरकारी पक्षाचा पुरावा विसंगत असल्याचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने हा निकाल दिला.

घटनेची पार्श्वभूमी

१६ नोव्हेंबर २०१८ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्यातील घेरडी येथे हा प्रकार घडला होता. फिर्यादीने खरेदी केलेल्या जमिनीच्या लगत आरोपींची शेतजमीन होती. फिर्यादीच्या ४४ गुंठे जमिनीत अतिक्रमण करून ती बळकवण्यात आली होती. याबाबत सरकारी मोजणी करून दगड रोवून तार कंपाउंड करण्यात आले होते, मात्र आरोपींनी हद्दीच्या खुणांचे दगड उपटून काढले.

घटनेच्या दिवशी फिर्यादी शेतात गेले असताना, आरोपींनी त्यांना विळा आणि खुरपी दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच जातीवाचक शिवीगाळ केली, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला होता.

न्यायालयात झालेली कारवाई

या प्रकरणी विभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी सांगोला तालुक्यातील घेरडी येथील छोटे पीर दस्तगीर पटेल, समीश पटेल, जंगलू पाशा पाटील, मैनुलाल पाटील, मोहसीन पाटील, बिरा निमग्रे, दादासाहेब करंडे, सरुबाई निमग्रे आणि कमल गरंडे यांच्याविरुद्ध विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याच्या सुनावणीदरम्यान मुख्य आरोपी छोटे पीर पटेल यांचे निधन झाले.

सुनावणीच्या वेळी सरकार पक्षाचा पुरावा विसंगत असून त्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असा युक्तिवाद आरोपी पक्षातर्फे मांडण्यात आला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

या खटल्यात आरोपींतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. सिद्धेश्वर खंडागळे, ॲड. सुहास कदम आणि ॲड. वैभव सुतार यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.