सोलापूर,दि.२४: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी एका मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपने आपल्याला पक्षात प्रवेश करण्यासाठी अनेकदा ऑफर दिली होती, असा खुलासा त्यांनी केला. मात्र, “मी काँग्रेसमध्ये (Congress) आहे, मग तिकडे (BJP) जाऊन परत काय करणार? उलट तिथल्या पक्षात येऊन तुमच्या पक्षात ढवळाढवळ नको,” असा मिश्कील सवाल करत आपण ती ऑफर स्पष्टपणे फेटाळल्याचे शिंदे यांनी सांगितले.
तसेच, इतर पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांच्या स्थितीवर भाष्य करताना त्यांनी, “भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नवीन नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे काय हाल होतात, हे मी जवळून पाहिले आहे,” असा परखड टोलाही लगावला. २५ वर्षांपूर्वीची परिस्थिती आठवत त्यांनी सांगितले की, त्यावेळीही अनेक जण पक्ष सोडून तिकडे गेले होते, मात्र अवघ्या ४ ते ५ वर्षांत ते पुन्हा आपापल्या घरी परतले.
नातवाच्या बॅनरबाजीचे समर्थन
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे नातू शिखर पाहारिया (Shikhar Pahariya) यांनी सोलापुरात शुभेच्छांचे बॅनर्स लावले होते. यावर बोलताना शिंदेंनी आपल्या नातवाची पाठराखण केली. “एखाद्या दिवशी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावले किंवा मी त्यांची भेट घेतली म्हणून आपली विचारधारा (Ideology) बदलत नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी या वादावर पडदा टाकला.
पंतप्रधान आणि शरद पवारांचे संबंध
यावेळी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यातील संबंधांवरही त्यांनी भाष्य केले. “पंतप्रधान जितके माझ्याशी बोलतात, तितकेच ते शरद पवारांशीही संवाद साधतात. शरदराव तर त्यांना थेट बारामतीला (Baramati) घेऊन जातात, मग त्यांना कोणी काय विचारणार? एखाद्या प्रकल्पाच्या किंवा कामाच्या उद्घाटनाला जाण्याने काहीच बिघडत नाही,” असे मत शिंदेंनी व्यक्त केले. मोदींकडून अनेक चांगल्या गोष्टी घडतात, काही गोष्टी वाईटही होतात; मात्र पत्रकारांनी या सर्व राजकारणाचे सखोल विश्लेषण केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
वाचन संस्कृती आणि राजकीय अभ्यास
एक राज्यशास्त्राचे (Political Science) विद्यार्थी असल्यासारखे आपण सर्वपक्षीय साहित्याचा अभ्यास करत असल्याचे शिंदे म्हणाले. नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) एक पुस्तक आपण आवर्जून वाचल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, सोलापुरात आलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPI-M) नेते आणि त्यांच्या चळवळीचा इतिहासही आपण वाचत असल्याचे सांगत त्यांनी राजकीय सुसंस्कृतपणाचे दर्शन घडवले. राजकारणात चुका होत असतात, पण लोकशाहीची मूल्ये जपली पाहिजेत, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.








