Home दुर्घटना खिशातला मोबाईल ठरला ‘टायमिंग बॉम्ब’! चालत्या बाईकवर स्फोट होऊन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

खिशातला मोबाईल ठरला ‘टायमिंग बॉम्ब’! चालत्या बाईकवर स्फोट होऊन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

0
मोबाईलच्या स्फोटात तरुणाचा मृत्यू

सोलापूर,दि.२१: आजच्या डिजिटल युगात खिशात स्मार्टफोन असणे ही अत्यंत सामान्य गोष्ट झाली आहे. पण हाच खिशातला मोबाईल कधी जीवघेणा ठरेल, याचा नेम नाही. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधून एक अत्यंत थरारक आणि मनाला सुन्न करणारी घटना उजेडात आली आहे, जिथे एका चालत्या बाईकवर असताना खिशातच मोबाईलचा स्फोट झाला आणि या दुर्घटनेत एका तरुणाला आपला प्राण गमवावा लागला.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फरनगरमध्ये राहणारा ४० वर्षीय विकास अंताल हा आपल्या मोटारसायकलवरून सुसाट वेगाने घरी चालला होता. तो रस्त्यात असतानाच अचानक त्याच्या पॅन्टच्या खिशात असलेल्या मोबाईल फोनची बॅटरी तीव्र उष्णतेमुळे फुटली आणि त्याचा भीषण स्फोट झाला. खिशात झालेल्या या स्फोटामुळे विकास हा प्रचंड हादरला, परिणामी त्याचे दुचाकीवरील ताबा सुटला आणि तो भररस्त्यात खाली कोसळला. या स्फोटाच्या तीव्रतेमुळे आणि अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

हे धोक्याचे इशारे ओळखले नाहीत, तर होऊ शकते भयंकर नुकसान!

स्मार्टफोन किंवा त्याची बॅटरी अचानक कधीच फुटत नाही. ती फुटण्यापूर्वी किंवा शॉर्ट सर्किट होण्यापूर्वी काही स्पष्ट संकेत देत असते. तुमच्याही फोनमध्ये यापैकी एखादे लक्षण दिसत असेल, तर वेळीच सावध व्हा:

फोनचा मागचा भाग फुगणे: मोबाईलचा बॅक पॅन वाकडा होणे किंवा तिथे गॅप तयार होणे म्हणजे बॅटरी खराब झाल्याचे सर्वात मोठे लक्षण आहे.

स्क्रीन बाहेर सरकणे: बॅटरी फुगल्यामुळे अनेकदा मोबाईलचा डिस्प्ले किंवा टच स्क्रीन बाहेरच्या बाजूला उचलू लागते.

विनाकारण फोन गरम होणे: कोणताही हेवी वापर किंवा गेमिंग न करताही मोबाईल वारंवार प्रचंड तापत असेल, तर तो धोक्याचा इशारा आहे.

जळल्याचा किंवा रबराचा वास: फोन वापरताना किंवा चार्जिंगला असताना जर त्यातून उग्र किंवा जळल्याचा वास येऊ लागला, तर डिव्हाइस त्वरित बंद करा.

लोकल किंवा हाय-वॅटेज चार्जरचा वापर: कंपनीच्या ओरिजिनल चार्जरऐवजी इतर कोणत्याही ड्युप्लिकेट किंवा अति-क्षमता असलेल्या चार्जरचा वापर करणे बॅटरीसाठी घातक ठरू शकते.

काळजी घ्या, अन्यथा आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते:

अनेकांना मोबाईल बेडवर ठेवण्याची, उन्हात वापरण्याची किंवा चुकीच्या चार्जरने चार्ज करण्याची सवय असते. ही छोटीशी निष्काळजीपणा थेट मृत्यूला आमंत्रण देऊ शकते. आजच आपल्या मोबाईलची स्थिती तपासा आणि सुरक्षित राहा!


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.