Home देश मनसे प्रमुख राज ठाकरेंचा मोठा संशय आणि गंभीर इशारा; म्हणाले, ‘पुढच्या २-५...

मनसे प्रमुख राज ठाकरेंचा मोठा संशय आणि गंभीर इशारा; म्हणाले, ‘पुढच्या २-५ महिन्यांत देशात…’

0

मुंबई,दि.२१: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रातील मोदी सरकारबाबत एक मोठे भाकीत केले होते. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही या वक्तव्याला दुजोरा देत एक खळबळजनक आणि गंभीर इशारा दिला आहे. आगामी दोन ते पाच महिन्यांत देशात काहीतरी मोठी उलथापालथ होईल, असा मोठा संशय व्यक्त करत त्यांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे.

बॅलेट पेपरवरून केंद्र सरकारवर निशाणा

ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा बोट ठेवताना राज ठाकरे म्हणाले की, “२०१८ पासून मी बॅलेट पेपरवर मतदान व्हावे, यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि अनेक पुढारलेल्या देशांत बॅलेट पेपरवरच मतदान होते. मग आपल्याकडेच मशीनचा अट्टहास का? आपण मतपेटीत मत टाकल्याचे खरे समाधान मतदाराला मिळाले पाहिजे. हरणे-जिंकणे हा वेगळा विषय आहे, पण मतमोजणीला चार दिवस जास्त लागले तरी चालतील, घाई कोणाला आहे?” फ्रान्सचे उदाहरण देत त्यांनी मशीन रद्द करून पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची आक्रमक मागणी केली.

‘पुढच्या २-५ महिन्यांत देशात काहीतरी मोठं होईल’

संजय राऊतांच्या ‘रेजीम चेंज’च्या वक्तव्याशी सहमती दर्शवत राज ठाकरे म्हणाले की, माझे याविषयी त्यांच्याशी बोलणे झाले आहे. येत्या दोन ते पाच महिन्यांत देशात काहीतरी मोठी राजकीय घडामोड घडणार, असा गंभीर इशारा त्यांनी दिला. सरकारकडून सतत चुका होत असून, येत्या काळात जर जनता रस्त्यावर उतरली तर मला अजिबात नवल वाटणार नाही, असे सांगत त्यांनी देशापुढील आर्थिक आणि सामाजिक संकटांची भीती व्यक्त केली. राज्यात दुष्काळ, अन्नधान्याची टंचाई यांसारख्या समस्या निर्माण होत असून, ही परिस्थिती सरकारला झेपणार नाही, असेही ते म्हणाले.

आंदोलक विद्यार्थ्यांची बाजू आणि स्वायत्त संस्थांवर प्रश्नचिन्ह

नीट (NEET) परीक्षा आणि विविध आंदोलनांचा संदर्भ देत राज ठाकरेंनी सरकारला धारेवर धरले. “लोकांच्या मनात कोणता ना कोणता रोष असतो, तो व्यक्त करण्यासाठीच मुले बाहेर पडली होती. मात्र, शांततेने आंदोलन करणाऱ्या पोरांवर तुम्ही लाठीचार्ज केला,” असे म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांवर झालेला बळाचा वापर चुकीचा असल्याचे म्हटले.

यावेळी देशातील स्वायत्त संस्थांच्या अस्तित्वावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे यांसारख्या महत्त्वाच्या संस्था खरोखरच स्वायत्त उरल्या आहेत का, असा सवाल त्यांनी केला. तसेच, २०१४ ची सत्ता नरेंद्र मोदींच्या नावावर आली होती, संघाच्या नव्हे, हे सांगत त्यांनी आरएसएसलाही सुनावले.

‘फक्त भाजप-स्पॉन्सर चित्रपटच पाहायचे का?’

देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलताना राज ठाकरेंनी डॉक्युमेंटरीचा मुद्दा उपस्थित केला. “शमीर भाटिया यांनी अदानी आणि मोदींवर एक डॉक्युमेंटरी केली, तर ती पोलिसांनी काढून टाकण्यास सांगितली. मग काय, फक्त भाजप-स्पॉन्सर चित्रपटच पाहायचे का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेले नाही, बदल हा निसर्गाचा नियम आणि गरज आहे, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर कडक प्रहार केला आहे.

राज ठाकरेंच्या या विधानांमुळे आगामी काळात राजकीय संघर्षाला अधिक धार चढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.