Home महाराष्ट्र फडणवीस यांच्या आजुबाजूला बहुजन समाजातील असे अनेक शुटर कार्यरत: आमदार रोहित पवार

फडणवीस यांच्या आजुबाजूला बहुजन समाजातील असे अनेक शुटर कार्यरत: आमदार रोहित पवार

0

नागपूर,दि.८: नागपुरात पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर तीव्र शब्दांत निशाणा साधला. मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला होता. यावर पलटवार करताना रोहित पवार म्हणाले की, गुणरत्न सदावर्ते हे गाढविणीचे दूध प्राशन करतात आणि त्यामुळेच त्यांची बुद्धी अशा प्रकारे चालते.

रोहित पवार पुढे म्हणाले की, गुणरत्न सदावर्ते हा मुख्यमंत्र्यांचा माणूस असून ते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी बोलत असतात. फडणवीस यांच्या आजुबाजूला बहुजन समाजातील असे अनेक शुटर कार्यरत असून, सदावर्ते हे त्यापैकीच एक आहेत आणि ते त्यांच्या इशाऱ्यावरच विधानं करत असतात. सदावर्तेंच्या वेशभूषेवर आणि रंगीबेरंगी गॉगलवर टिपणी करत त्यांनी स्पष्ट केले की, सर्वसामान्य नागरिक गाय किंवा म्हशीचे दूध पितात, परंतु सदावर्ते यांच्यासारखे वर्तन गाढविणीच्या दुधाच्या परिणामांमुळेच पाहायला मिळते.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, हे एक सामाजिक आंदोलन असून मनोज जरांगे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत; त्यांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या या आंदोलनावर मुख्यमंत्री आणि मराठा आंदोलकांमध्ये थेट चर्चा सुरू असल्यामुळे राजकीय नेत्यांनी मध्ये न बोलणेच योग्य राहील. यासोबतच मराठा आणि धनगर समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळवून देण्यासाठी संसदेत घटनादुरुस्ती करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी दिल्लीत एकत्र येऊन केंद्राकडे पाठपुरावा करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.