सोलापूर,दि.७: महाराष्ट्रात श्रावण अमावस्येला (पिठोरी अमावस्या) साजरा केला जाणारा बैलपोळा हा सण शेतकरी आणि बैलांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. राज्यभरात गावोगावी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. पूर्वी बैलपोळा अत्यंत नैसर्गिक पद्धतीने साजरा केला जात असे; मात्र काळाच्या ओघात पोळा साजरा करण्याच्या पद्धतींमध्ये मोठे बदल झाले आहेत.
बैलांना सुंदर दाखवण्यासाठी त्यांची शिंगे तासणे, शिंगांवर व शरीरावर रासायनिक रंग लावणे, तसेच डॉल्बी व डीजेच्या कर्णकर्कश आवाजात त्यांना तासनतास मिरवणुकीत उभे करणे यांसारख्या चुकीच्या पद्धती वाढल्या आहेत. या प्रकारांमुळे बैलांच्या डोळ्यातून सतत पाणी येणे, डोळ्यांचे गंभीर आजार आणि शिंगांचा कर्करोग (कॅन्सर) होण्याचा धोका असतो.
बैलांना होणारा हा शारीरिक त्रास आणि आजार टाळण्यासाठी ‘ॲनिमल राहत’ या संस्थेने सर्व बैलमालकांना खालीलप्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
काय टाळावे?
बैलांना सजवताना किंवा सण साजरा करताना कोणताही शारीरिक त्रास देऊ नका.
शिंगे तासू नका आणि शिंगांवर किंवा शरीरावर रासायनिक रंग लावू नका.
मोठ्या आवाजाच्या डॉल्बी किंवा डीजेसमोर बैलांना जबरदस्तीने उभे करू नका.
पोळा कसा साजरा करावा?
शिंगे तासण्याऐवजी त्यांना सजवण्यासाठी रंगीत रिबीनचा वापर करा.
रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक फुलांनी बैलांना सजवा.
शांत वातावरणात उत्सव साजरा करा आणि बैलांना जबरदस्तीने नाचवणे टाळा.
सणाच्या दिवशी बैलांना पुरेसा आराम, योग्य आहार आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्या.
वेसणीऐवजी म्होरकीचा आणि दोन दाव्यांऐवजी एका दाव्याचा वापर करा.
बैल व इतर जनावरांना दररोज नियमित खरारा करा.
“बैलपोळा हा सण बैलांचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व आभार व्यक्त करण्यासाठी असतो; त्यांना अनैसर्गिक त्रास देण्यासाठी नाही. त्यामुळे पोळा साजरा करताना बैलांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी,” असे आवाहन ॲनिमल राहतचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश जाधव यांनी केले आहे.
‘ॲनिमल राहत’ संस्था सोलापूर व पंढरपूर जिल्ह्यांमध्ये बैलांप्रती प्रेमभावना वाढवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवत आहे. तसेच, इच्छुक शेतकऱ्यांना त्यांच्या बैलांची मोफत तपासणी व उपचारासाठी संस्था मदत करत आहे.
संपर्क:
ॲनिमल राहत, सोलापूर: ९५५२५५२०४८
ॲनिमल राहत, पंढरपूर: ९५५२५५२०४९








