सोलापूर,दि.७: दक्षिण सोलापूर (Solapur) तालुक्यातील कासेगाव (Kasegaon) येथे सुमारे १३०० वर्षांपूर्वीचे हेमाडपंथी शंभू महादेव मंदिर आहे. पुरातन वास्तुकलेचा हा एक उत्तम नमुना मानला जातो. त्यामुळे श्रावण महिन्यात या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येते.
मंदिराचे वैशिष्ट्य
मंदिराच्या गाभाऱ्यात दीड ते दोन फूट उंच सिंहासनावर शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. अशा प्रकारे सिंहासनावर स्थापित असलेले शिवलिंग दुर्मीळ असल्याचे येथील ज्येष्ठ नागरिक सांगतात. सकाळी सूर्याची पहिली किरणे थेट शिवलिंगावर पडतील, अशी या मंदिराची रचना करण्यात आली आहे.
वास्तुकला व परिसर
मंदिर अत्यंत सुबक आणि रेखीव असून येथील दगडांवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. कोरीव व आकर्षक खांब उपस्थितांचे लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या शिखरावर हनुमान व इतर देव-देवतांच्या मूर्ती तसेच १२ ज्योतिर्लिंगे साकारण्यात आली आहेत. शिवलिंगासमोर पितळी धातूचा नंदी आहे. मंदिराच्या शेजारी याच शैलीत बांधलेली गणपती व बळी देवतांची स्वतंत्र मंदिरे आहेत. तसेच परिसरात शंकराला प्रिय असणारे चाफ्याचे झाडही आहे.

धार्मिक परंपरा व उत्सव
मंदिरात दररोज पहाटे आणि संध्याकाळी पूजा व आरती केली जाते. चैत्र महिन्यात येथे सात दिवसांची मोठी यात्रा भरते. या यात्रेपूर्वी गंगेवाडी व कासेगाव येथील ग्रामस्थ कावड घेऊन शिखर शिंगणापूरला जातात आणि कठीण मानल्या जाणाऱ्या मुंगी घाटातूनही ही कावड सहज वर नेतात. तेथून कावड परत आणून मंदिरात पूजा केली जाते आणि गावातून मिरवणूक काढली जाते.
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मंदिरात विविध फळांचा वापर करून आकर्षक पूजा बांधली जाते. या पवित्र वातावरणात दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांची मोठी झुंबड उडते.
जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात
ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिराच्या शिखराचा जीर्णोद्धार करून रंगरंगोटी केली आहे, ज्यामुळे मंदिर अधिक आकर्षक दिसत आहे. याशिवाय, माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रयत्नातून मंदिरासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सध्या पुरातत्त्व विभागामार्फत मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे.







