नवी दिल्ली,दि.३: रस्त्यावर वारंवार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकार ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) आणि वाहन नोंदणीशी (Vehicle Registration) संबंधित नियमांमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. या नव्या नियमांनुसार, ट्रॅफिक नियम तोडल्यास चालकाच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर ‘नेगेटिव्ह पॉइंट’ (Negative Points) जोडले जातील. हे पॉइंट ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास लायसन्स रद्द किंवा सस्पेंड केले जाऊ शकते.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी गुरुवारी (३ सप्टेंबर) नवी दिल्लीत ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स’ (SIAM) च्या एका कार्यक्रमादरम्यान या नवीन प्रस्तावाची माहिती दिली.
काय म्हणाले नितीन गडकरी?
कार्यक्रम प्रसंगी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, “सरकार एक ‘ग्रेडेड पॉइंट सिस्टम’ (Graded Point System) आणण्याचा विचार करत आहे. वारंवार ट्रॅफिक नियम तोडणाऱ्या चालकांची ओळख पटवणे आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.” सरकार गेल्या काही महिन्यांपासून या यंत्रणेवर काम करत आहे.
कसा असणार नवा नियम?
कठोर कारवाई: चालकाने ट्रॅफिक नियम तोडल्यास (उदा. ओव्हरस्पीडिंग, सिग्नल जंपिंग इत्यादी) त्याच्या लायसन्समध्ये नेगेटिव्ह पॉइंट जोडले जातील. नियमांचे जितक्या वेळा उल्लंघन होईल, तितकी कारवाई अधिक कठोर केली जाईल.
लायसन्स सस्पेंड किंवा रद्द: जमा झालेल्या नेगेटिव्ह पॉइंट्सची संख्या एका ठरवून दिलेल्या मर्यादेवर पोहोचल्यास संबंधित चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड (निलंबित) केले जाईल. तसेच, वारंवार आणि गंभीर स्वरूपाचे नियम मोडणाऱ्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द देखील केले जाऊ शकते.
चांगल्या चालकांना मिळणार फायदा: नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करतानाच, जे चालक नियमांचे तंतोतंत पालन करतात आणि ज्यांचा ड्रायव्हिंग रेकॉर्ड चांगला आहे, अशा चालकांना विमा कंपन्यांकडून विशेष सवलती किंवा प्रोत्साहन (Incentives) दिले जाऊ शकते, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.
रस्त्यावरील अपघात रोखणे आणि शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी ही नवीNegative Point System लवकरच देशभरात लागू केली जाण्याची शक्यता आहे.








