नवी दिल्ली,दि.१०: Coronavirus: देशात कोरोना रुग्णांची संख्या (Corona Cases In India) पुन्हा वाढत आहे. वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ओमिक्रॉन व्हेरीयंट (Omicron Variant) रुग्ण आढळत आहेत. देशात बूस्टर डोस (Booster Dose) देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दिल्लीतील हॉस्पिटल्समधील डॉक्टरांनाही संसर्ग होत आहे. दिल्लीत जवळपास ७०० ते ८०० डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. या डॉक्टरांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आता संसर्ग झालेल्या या डॉक्टरांना ७ दिवस क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आलं आहे. त्यानंतर कोणतीही चाचणी न करता त्यांना ड्युटीवर रुजू होण्याचा सल्ला दिला जात आहे. दिल्लीच्या ईएसआय हॉस्पिटलचे निवासी डॉक्टर रोहन कृष्णन यांनी ही माहिती दिलीय.
दिल्लीतील हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. दिल्लीतील केवळ ५ मोठ्या हॉस्पिटल्समधील ८०० हून अधिक डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह डॉक्टरांच्या संपर्कात आलेले डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारीही आयसोलेशनमध्ये आहेत. मोठ्या प्रमाणात आरोग्यसेविका पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य व्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. रुग्णालयात नियमित तपासणी, ओपीडी आणि अनावश्यक शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या आहेत.
हॉस्पिटल्समधील सर्वात वाईट स्थिती दिल्लीच्या एम्समध्ये आहे. एम्समध्ये काम करणारे सुमारे ३५० निवासी डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हा आकडा फक्त कोविड पॉझिटिव्ह निवासी डॉक्टरांचा आहे, प्राध्यापक, पॅरामेडिकल कर्मचारी जोडले तर हा आकडा खूप मोठा होईल, असे सूत्रांनी सांगितले.
‘एवढ्या मोठ्या संख्येने हॉस्पिटल आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाल्याचा परिणाम आरोग्यसेवेर झाला आहे. दिल्ली एम्समध्ये बाह्यरुग्ण सेवा, नियमित प्रवेश आणि शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या आहेत’, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. गेल्या दोन दिवसांत दिल्लीतील एम्सचे सुमारे १५० निवासी डॉक्टर पॉझिटिव्ह आढळले आहेत.
दिल्लीतील इतर मोठ्या हॉस्पिटल्सची हीच स्थिती आहे. सुमारे ८० ते १०० डॉक्टर पॉझिटिव्ह आढळले आहेत, असे असे सफदरजंग रुग्णालयातील सूत्रांनीही सांगितले. राम मनोहर लोहिया रुग्णालयातील १०० हून अधिक डॉक्टरांना करोना संसर्ग झाला आहे. दुसरीकडे, लोकनायक रुग्णालयातील ५० ते ७० निवासी डॉक्टर आणि लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजचे १५० निवासी डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह आहेत. दैनिक भास्करने हे वृत्त दिले आहे.
 
            
