मुंबई,दि.30 : CM Uddhav Thackeray: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना (Covid -19) रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच कोरोनाचा नवीन व्हेरीयंट ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) रुग्णांची संख्या राज्यात वाढत आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यात गेल्या सात दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे. एका दिवसात कोरोना रुग्ण दुपटीनं वाढल्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. रुग्णवाढ झपाट्यानं होत असल्यानं राज्यात पुन्हा काही कठोर निर्बंध लादले जाण्याची दाट शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही तातडीनं कोरोना टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. या बैठकीत वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निर्बंध वाढविण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज दुपारी होणारी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक देखील मुख्यमंत्र्यांनी रद्द केली आहे. राज्य सरकारनं आता पूर्णपणे कोरोना रुग्णवाढीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे.
राज्यात काल 3900 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात 2510 रुग्ण तर एकट्या मुंबईतून आढळले आहेत. तसंच ओमायक्रॉनचे देशातील सर्वात जास्त रुग्ण दिल्लीनंतर महाराष्ट्रातच आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेची सुरुवात ओमायक्रॉनमुळे होऊ शकते असं मत देखील तज्ज्ञांनी याआधीच व्यक्त केलं आहे. दिल्लीत ओमायक्रॉनचे 263 तर महाराष्ट्रात 252 रुग्ण सापडले आहेत. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटपेक्षाही अधिक वेगानं ओमायक्रॉन व्हेरिअंटचा प्रसार होतो. त्यामुळे कमीत कमी कालावधीत कोरोना पुन्हा एकदा थैमान घालू शकतो याचा अंदाज घेत सरकार सतर्क झालं आहे.