मुंबई,दि.२९: महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना ओमिक्रॉन व्हेरीयंटने (Omicron Variant) अनेक देशात कहर केला आहे. ओमिक्रॉन (Omicron) रुग्णांची संख्या देशातही वाढत आहे. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी कोरोनाची तिसरी लाट आली तर ती ओमिक्रॉनची असेल असे यापूर्वीच वक्तव्य केले होते.
गेल्या काही दिवसांत मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या अचानकपणे वाढल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी मंगळवारी विधानसभेत राज्यातील कोरोनाच्या स्थितीबाबत चिंतेत भर घालणारी माहिती दिली आहे. महाराष्ट्रामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते, अशी भीती राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील कोरोनास्थितीबाबत माहिती देताना राजेश टोपे म्हणाले की, राज्यात आतापर्यंत १६७ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. आज राज्यात कोरोना रुग्णवाढीचा जो ६००-७०० दरम्यान आकडा होता तो एकदम वाढला आहे. राज्यात १६०० नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे गती अशीच वाढत गेली तर ओमायक्रॉनचा रुग्णदुप्पटीचा वेग हा एक-दोन दिवसांचा आहे. आज रुग्णसंख्या कमी असल्याने तो आकडा कमी दिसत आहे. मात्र रुग्णसंख्या वाढली तर रुग्ण दुपटीचे प्रमाण वेगाने वाढून मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होईल आणि जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ दिसून येईल. त्यामुळे ओमायक्रॉनच्या संदर्भात आपण सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे, असं आवाहनही राजेश टोपे यांनी यावेळी केले.