सिरमौर,दि.२३: हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) सिरमौर जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील ‘इटरनल युनिव्हर्सिटी’च्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये (Girls Hostel) विद्यार्थिनींचे बाथरूममधील वैयक्तिक व्हिडिओ चोरून बनवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थिनींनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आरोपी पुरुष कर्मचाऱ्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, सिरमौर जिल्ह्यातील एका विद्यापीठाच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींना त्यांच्या प्रायव्हसीचा गैरवापर होत असल्याचा संशय आला.
काही विद्यार्थिनी बाथरूममध्ये (Private Bath) असताना, तेथील एका पुरुष सफाई कर्मचाऱ्याने लपून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केले.
हा प्रकार विद्यार्थिनींच्या लक्षात येताच हॉस्टेलमध्ये एकच खळबळ उडाला.
आरोपी सफाई कर्मचारी हा मूळचा झारखंडचा रहिवासी असून, गुन्हा उघडकीस आल्यानंतर त्याने कॅम्पसमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या विद्यार्थिनींनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
युनिव्हर्सिटी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप
या घटनेनंतर युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये विद्यार्थिनींनी तीव्र आंदोलन आणि निदर्शने केली. प्रशासनाला या घटनेची माहिती मिळूनही त्यांनी पोलिसांना कळवण्यास सुमारे अडीच तास उशीर केला, असा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. वाढता तणाव पाहून अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
पोलिसांची कारवाई: पच्छाद पोलिसांनी आरोपी सफाई कर्मचाऱ्याला अटक केली असून त्याचा मोबाईल जप्त केला आहे. हा व्हिडिओ त्याने इतर कोणाला पाठवला आहे का, याचा तपास सायबर सेल आणि पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे हॉस्टेलमधील सुरक्षेचा मुद्दा आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.








