सोलापूर,दि.१३: नाशिकचा कुख्यात भोंदूबाबा अशोक खरात याच्या बेकायदा साम्राज्याचे धागेदोरे आता सोलापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. खरातने आपल्या काळ्या पैशाची गुंतवणूक सोलापूरच्या जमिनींमध्ये केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण शिवारात खरात आणि त्याच्या पत्नीच्या नावावर तब्बल ११ एकर ४ गुंठे जमीन असल्याची नोंद महसूल विभागात आढळली आहे.
शक्तीपीठ महामार्गाचा ‘असा’ उठवला फायदा
नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग या जमिनीतून जाणार असल्याचे खरातने आधीच हेरले होते. भविष्यात मिळणारा अवाढव्य मोबदला डोळ्यासमोर ठेवून हा जमिनीचा व्यवहार करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, जमिनीचा दर वाढवण्यासाठी पडीक जमिनीवर चक्क २,००० डाळिंबाची झाडे असल्याचे कागदोपत्री दाखवून शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही झाला आहे.
कसा झाला हा संशयास्पद व्यवहार?
या जमिनीच्या व्यवहाराची साखळी अत्यंत रंजक आणि संशयास्पद आहे:
• २०२१: मूळ मालक राजाराम बनसोडे यांनी आर्थिक अडचणीमुळे ही जमीन नरखेडचे सेवानिवृत्त शिक्षक कोल्हाळ यांना ५० लाख रुपयांत विकली.
• २०२५: कोल्हाळ यांनी हीच जमीन अवघ्या काही वर्षांत २ कोटी २५ लाख रुपयांना अशोक खरातला विकली.
• २६ जून २०२५: या व्यवहाराची अधिकृत नोंद सातबाऱ्यावर झाली.
CA चाही मास्टरमाईंड गेम?
केवळ खरातच नाही, तर त्याचा सीए ललित पोफळे याचाही या गैरव्यवहारात सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोफळे यानेही याच परिसरात आपल्या पत्नीच्या नावावर जमीन खरेदी केली आहे. हा सर्व प्रकार एक सुनियोजित कट असल्याचा संशय तपासातून व्यक्त होत आहे.
“आमची फसवणूक झाली!” – मूळ मालकाचा आक्रोश
मूळ जमीन मालक राजाराम बनसोडे यांनी गंभीर आरोप केले आहेत. “आम्हाला खोटे सांगून जमीन घेण्यात आली. शक्तीपीठ महामार्ग इथून जाणार आहे, याची आम्हाला कल्पना दिली नाही. आमची जमीन आम्हाला परत मिळावी,” अशी मागणी बनसोडे यांनी केली आहे.








