मुंबई,दि.२८: पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर जवळपास एका दशकाने महाराष्ट्र एटीएसचे माजी प्रमुख के.पी. रघुवंशी यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. पत्रकार जितेंद्र दीक्षित लिखित ‘ट्रबलशूटर’ या चरित्रात के.पी. रघुवंशी बाळासाहेब ठाकरे अटक प्रकरणाबाबत अत्यंत महत्त्वाचे दावे करण्यात आले आहेत.
या पुस्तकातील दाव्यानुसार, १९९३ च्या मुंबई दंगलीच्या काळात महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ मंत्र्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याची मागणी केली होती. मात्र, के.पी. रघुवंशी यांनी तत्कालीन राजकीय दबावाचा विरोध करत पुराव्याशिवाय ही कारवाई करण्यास स्पष्ट नकार दिला होता.
केवळ ठाकरेच नव्हे, तर २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरएसएस नेते इंद्रेश कुमार यांच्यावरही अटकेसाठी दबाव आला होता. यूपीए सरकारमधील एका बड्या मंत्र्याचा फोन येऊनही रघुवंशी यांनी ठोस पुरावे नसल्याने कारवाई केली नाही. याच राजकीय दबावांना न झुकल्यामुळे २०१० मध्ये त्यांची एटीएस प्रमुखपदावरून बदली करण्यात आल्याचेही या पुस्तकात म्हटले आहे. के.पी. रघुवंशी बाळासाहेब ठाकरे अटक आणि मालेगाव प्रकरणातील हे खुलासे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत.








