भाजपची ‘फिल्डिंग’ तयार: सभापती निवडीत लिंगायत कार्ड की शहर उत्तरचा मान?

0

सोलापूर,दि.२७: मागील चार वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या सोलापूर महानगरपालिकेला अखेर लोकनियुक्त स्थायी समिती सभापती मिळणार आहे. येत्या ६ मार्च रोजी या पदासाठी निवडणूक होणार असून, सत्ताधारी भाजपमध्ये आता कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभापती निवडीत लिंगायत कार्ड की शहर उत्तरचा मान? हे लवकरच स्पष्ट होईल. 

यामुळे तब्बल ८ वर्षांच्या खंडानंतर महापालिकेला लोकनियुक्त सभापती मिळणार आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने सभापती भाजपचाच होणार हे निश्चित आहे. निवडीमध्ये जातीय समीकरणे आणि राजकीय गटातटांचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.

कोणाची वर्णी लागणार? शर्यतीत कोण?

भाजपने यापूर्वी महापौर आणि सभागृह नेते पदासाठी ओबीसी तर उपमहापौर पदासाठी मराठा कार्ड वापरले होते. त्यामुळे आता लिंगायत समाजाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

लिंगायत समाज: रंजीता चाकोते किंवा अविनाश पाटील.

शहर उत्तर गट: बिज्जू प्रधाने, राजकुमार पाटील, अमर पुदाले किंवा गणेश वानकर.

दिलीप माने गट: जयकुमार माने.

निवडीचे वेळापत्रक

विभागीय आयुक्तांनी जाहीर केल्यानुसार निवडीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे असेल:

1. ४ मार्च (सकाळी ११ ते १:३०): नामनिर्देशन पत्र (अर्ज) दाखल करणे.

2. ६ मार्च (सकाळी ११:००): अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश निराळी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आणि निवड.

महत्त्वाची जबाबदारी: नवनिर्वाचित सभापती आणि समितीला सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे बजेट तयार करण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रशासक बजेट मांडत होते, आता लोकप्रतिनिधींना शहराच्या विकासाचा आराखडा मांडण्याची संधी मिळणार आहे.

बिनविरोध निवडीचे संकेत

समितीमध्ये भाजपचे १४ सदस्य असल्याने आणि विरोधात केवळ दोनच सदस्य असल्याने, ही निवड बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडीही बिनविरोध झाल्या होत्या, तोच पायंडा इथेही पाळला जाऊ शकतो.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here