भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून काँग्रेस नेत्याला केली मारहाण 

0
काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार

पुणे,दि.२४: काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील मित्र मंडळ चौकात घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, हा हल्ला भाजपचे कार्यकर्ते तुषार दामगुडे याने केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

दरम्यान, या घटनेचा आम्ही निषेध करतो. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे कार्यकर्ते तुषार दामगुडेला अटक करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट करीत या घटनेचा निषेध केला आहे.

पुण्यात सोमवारी एका न्यूज चॅनेलकडून ‘शिवरायांचा अवमान, मराठी अस्मिता गपगुमान’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. होते. त्यानंतर काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे यांच्यात कार्यालयाबाहेर जोरदार शाब्दिक वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले.

मारहाणीच्या घटनेनंतर हनुमंत पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कार्यक्रम संपल्यावर मी कार्यालयातून बाहेर पडत होतो. यादरम्यान गेटबाहेर थांबलेल्या दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी मला शिवीगाळ करून बोलावले आणि तू भाजप-संघाला विरोध का करतो, हर्षवर्धन सपकाळ यांची बाजू का घेतो, असा जाब विचारला. तुषार दामगुडे यांनी मला पिस्तुल दाखवले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले, असे सांगितले. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना केलेल्या शिवीगाळीचा हनुमंत पवार यांनी तीव्र विरोध केला होता. याच जुन्या वादाचा राग धरून दामगुडे यांनी सोमवारी पवार यांना ‘तू हर्षवर्धन सपकाळांची बाजू घेणारा कोण?’ असा जाब विचारत त्यांच्यावर हा हल्ला केला. पवार यांच्या दाव्यानुसार, मागील चर्चेतील ती शाब्दिक चकमकच या मारहाणीमागचे प्रमुख कारण ठरली असून, वैचारिक विरोधाचे रूपांतर अशा प्रकारे शारीरिक हिंसाचारात झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here