मुंबई,दि.२१: राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार सुनील शेळके (MLA Sunil Shelke) यांनी भाजपला आव्हान दिले आहे. शेळके म्हणाले, ‘ईव्हीएम मशीन हॅक करण्याच्या नावाने भाजपच्या नेत्यांनी लाखो रुपये गोळा केले, याचा पुरावा न्यायालयात सादर करू.’ राष्ट्रवादी अजित पवार गट महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या बरोबर सत्तेत आहे. सत्ताधारी आमदारानेच भाजप नेत्यांना आव्हान दिले आहे.
नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स (EVM) हॅक करण्याच्या नावाने लाखो रुपये गोळा केल्याचा आरोप केला आहे. भाजपने त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. शेळके यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले आहे. भाजपवाल्यांनी हिंमत असेल तर आपल्याविरुद्ध दावा ठोकावा, त्यानंतर मी कोर्टात पुरावे सादर करेल, असे आव्हानच शेळके यांनी दिले आहे.
सुनील शेळके यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना स्थानिक भाजप नेत्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, भाजपवाल्यांना खरोखरच अब्रू असेल तर त्यांनी माझ्यावर आठ दिवसांत अब्रुनुकसानीचा दावा ठोकावा. त्यानंतर कोर्टाकडून मला समन्स येईल तेव्हा मी पुरावे कोर्टात सादर करेन. तत्पूर्वी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात मी लेखी स्वरूपात तक्रार देणार आणि विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनाही पुरावे देणार आहे.
आमदार शेळके यांच्या आरोपानंतर माजी राज्यमंत्री संजय भेगडे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार शेळके यांनी केलेले आरोप फेटाळून 8 दिवसांत आरोप सिद्ध करा, अन्यथा अबुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता.
आमदार शेळके यांनी पुणे जिल्ह्यात ईव्हीएम हॅकर्सचे मोठे रॅकेट असल्याचा खळबळजनक दावा केला असून, हे हॅकर्स निवडणूक काळात काही उमेदवारांना हेरतात व ईव्हीएम मशीन हॅक करण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचे डील करतात. यामध्ये विजय झाला तर पैसे त्यांना आणि पराभव झाला तर पैसे परत असा प्रकार असतो. अशाच हॅकर्सच्या टोळीला मावळातील भाजपचे नेते भेटले, उमेदवारांनी त्यांना पैसे द्यायचे, उमेदवार विजयी नाही झाला तर पैसे परत मिळणार असे डील केल्याचा आरोप शेळके यांनी केला.








