मुंबई,दि.११: भाजपने हिंदू-मुस्लिम वाद न लावता लढलेली एक निवडणूक दाखवावी, मी त्यांना 11 लाख रुपये देणार असे शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्यातील महापालिके करिता मतदान 15 जानेवारीला होणार आहे. या निवडणुकीत विकास, सुधारणा आदी मुद्द्यांवर न लढता धार्मिक भावना भडकावून लढवल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
नागरी सुविधांच्या मुद्द्यावर लढल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजप जाणीवपूर्वक हिंदू-मुसलमान असे मुद्दे उपस्थित करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. ज्या निवडणुकीत भाजपने हिंदू-मुस्लिम वाद निर्माण केला नाही, अशी एक तरी निवडणूक फडणवीसांनी दाखवून द्यावी, असे आव्हान देत संजय राऊत यांनी 10 लाख रुपयांच्या इनामाची भर टाकली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याचे आव्हान देत, तसे केल्यास बक्षीस जाहीर केले होते. याला उत्तर देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, भाजपने हिंदू-मुस्लिम वाद न लावता लढलेली एक निवडणूक दाखवावी, मी त्यांना 1 लाख रुपये देईन, असे म्हटले होते. याच संदर्भाचा धागा पकडत संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना आक्रमक पवित्रा घेतला. उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या 1 लाख रुपयांमध्ये मी पक्षाच्या वतीने 10 लाख रुपये जोडत आहे, असे सांगत राऊत यांनी एकूण 11 लाख रुपयांचे आव्हान फडणवीसांसमोर ठेवले आहे. ही रक्कम फडणवीस कधीही घेऊन जाऊ शकतात आणि ती त्यांच्या पक्षनिधीला देऊ शकतात, असा टोलाही त्यांनी लगावला.








